आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची नातेपुते, माळशिरस ग्रामीण रुग्णालयांना भेटी

Health Minister Tanaji Sawant relatives visit Malshiras rural hospital

सोलापूर : ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद आरोग्य विभागाचे आहे. रुग्णालयामध्ये स्वच्छतेला महत्त्व देत कागदपत्रात न अडकता रुग्णांना चांगली सेवा द्या, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी आज नातेपुते (ता. माळशिरस) येथे केले. मंत्री सावंत यांनी नातेपुते आणि माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.

आमदार राम सातपुते, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव मोरे, नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नम्रता व्होरा, माळशिरसचे वैद्यकीय अधीक्षक मझहर काझी उपस्थित होते.

मंत्री सावंत यांनी केस पेपर पद्धत, वैद्यकीय कक्ष, परिचारिका कक्ष, स्त्री आणि पुरुष रुग्ण कक्ष आणि त्यातील स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया विभाग याठिकाणी भेट देवून विविध सूचना केल्या.

रुग्णालय स्वच्छतेसाठी दोन कर्मचारी नेमा
प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता ठेवावी. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक पातळीवर निविदा काढून दोन व्यक्ती स्वच्छतेसाठी नेमण्याचे निर्देश मंत्री सावंत यांनी दिले. त्या कर्मचाऱ्यांना दीडशेऐवजी वाढवून पैसे द्यावेत, असेही त्यांनी सांगितले. रुग्णालयात आगीचे प्रकार घडत आहेत, ग्रामीण रुग्णालयानी फायर ऑडिट करून घ्यावे. तज्ज्ञमार्फत अग्निशमनविषयी प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

रुग्णालयात ठिकठिकाणी फलक लावावेत
रुग्णालयात ग्रामीण भागातून रुग्ण येत असतात. रुग्णांना कुठे काय आहे, याची माहिती समजण्यासाठी त्यांना समजेल अशा भाषेत ठिकठिकाणी कायमस्वरूपी सूचना फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ऍडमिट रुग्णांजवळ रोगनिदान कागद ठेवावा
रुग्णालयात रुग्ण ऍडमिट होतो. ऍडमिट झालेल्या ठिकाणी रुग्णाला काय आजार आहे, उपचार काय सुरु आहेत. याबाबत त्याच्या कॉटजवळ रोगनिदान कागद ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. नातेपुते आणि माळशिरस दोन्ही ठिकाणी मंत्री सावंत यांनी पुरुष आणि स्त्री रुग्ण कक्षाला भेट देवून रुग्णांची विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *