मुंबई : राज्यातील सोलापूरसह कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर व नांदेड या ठिकाणी स्वातंत्र्य दिनी (१५ ऑगस्ट) संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मंत्रीमंडळ विस्तार करुनही अद्याप पालकमंत्री नेमलेले नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरावरील यंत्रणांना पालक नाहीत.

स्वातंत्र्यदिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण केले जाते. मात्र मंत्र्यांना अद्याप जिल्ह्यांचे वाटप झाले नसल्याने कोणता मंत्री 15 ऑगस्टच्या दिवशी कोठे जाणार, याची उत्सुकता होती. त्यावर यादी प्रसीद्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसह 20 मंत्री असल्याने इतर 16 जिल्ह्यात विभागीय आयुक्त किंवा संबंधित जिल्हाधिकारी तर अमरावती येथे विभागीय आयुक्त यांच्यावर ध्वोजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार बहुतांश नेत्यांना आपापले जिल्हे दिले आहेत. आता जे मंत्री ध्वजारोहणासाठी येतील तेच पालकमंत्री त्या जिल्ह्याचे राहतील का? याची उत्सुकता आहे. सर्वाधिक उत्सुकता ही पुण्याची आहे. कारण पुण्याचे पालकमंत्रीपद खुद्द देवेंद्र फडणवीस स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. तसे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिले होते. सोलापूर जिल्ह्याबाबतही उत्सुकता आहे. येथे सर्वाधिक आमदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे येथे भाजपचा पालकमंत्री दिला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे शिंदे समर्थक बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचेही नाव चर्चेत आहे. प्रत्यक्षात सावंत हे उस्मानाबाद येथेच ध्वजारोहण करणार आहेत.

सविस्तर यादी पुढीलप्रमाणे (कंसात जिल्ह्याचे नाव) : देेवेंद्र फडणवीस (नागपूर), सुधीर मुनगंटिवार (चंद्रपूर), चंद्रकांत पाटील (पुणे), राधाकृष्ण विखे पाटील (अहमदनगर), गिरीश महाजन (नाशिक), दादा भुसे (धुळे), गुलाबराव पाटील (जळगाव), रवींद्र चव्हाण (ठाणे), मंगलप्रभात लोढा (मुंबई उपनगर), दीपक केसरकर (सिंधुदुर्ग), उदय सामंत (रत्नागिरी), अतुल सावे (परभणी), संदिपान भुमरे (औरंगाबाद), सुरेश खाडे (सांगली), विजयकुमार गावित (नंदुरबार), तानाजी सावंत (उस्मानाबाद), शंभूराज देसाई (सातारा), अब्दुल सत्तार (जालना), संजय राठोड (यवतमाळ).

