मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख ‘जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील’ कैद्यांसाठी आज (गुरुवारी) ‘जीवन गाणे गातच जावे..’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागाने दिली आहे. समुपदेशन, प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमातून सदर कार्यक्रम सादर होणार आहे.

देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या अंतर्गतच ‘स्वराज्य महोत्सव’ निमीत्त, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत विविध सांस्कृतिक, देशभक्तीपर, थोर संत, जेष्ठ साहित्यीक व कवी, थोर महापुरुष यांच्या जीवनकार्यावर आधारीत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संपुर्ण राज्यभर करण्यात येत आहे.

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैदयांना; स्वातंत्र्य, देशभक्ती, योगाचे महत्व, प्रबोधन व समुपदेशन करणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन गुरुवारी (ता. 11) सकाळी 11 वाजता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

कैदयांकरीता आयोजित या कार्यक्रमात, महाराष्ट्रच्या लोककले सोबतच, कैदयांचे प्रबोधन, योगाचे महत्व, देशभक्ती भावना जागृत करणाऱ्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग व गृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असणाऱ्या कैदयांनाही त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आयोजित आजपर्यत एकाच वेळी 36 जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैदयाकरीता कार्यक्रम करण्याचा महाराष्ट्र तसेच देशातील हा पहिलाच अभिनव असा उपक्रम आहे.
