करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या आज (सोमवारी) झालेल्या सुनावणीत पुढील तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील सूनवणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आदिनाथ कारखान्याची मुंबई येथील ‘डीआरएटी’ न्यायालयात सुनावणी झाली. त्यात १३ सप्टेंबर ही तारीख देण्यात आली आहे.

आदिनाथ कारखान्याचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. संचालक मंडळाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (एमएससी) केलेल्या कारवाईविरुद्ध याचिका दाखल केली होती. पुणे येथील डीआरटी न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध मुंबई येथील डीआरएटी न्यायालयात अपील केले. तेथील निकालानंतरही संचालक मंडळ उच्च न्यायालयात गेले. त्यानंतर पैसे भरण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली होती.

दरम्यान बँकेने संचालक मंडळाला ओटीसला परवानगी दिली होती. त्यानुसार संचालक मंडळाने आदिनाथसाठी पैसे भरले. 6 जुलै माजी आमदार नारायण पाटील यांनी 1 कोटी भरले होते. त्यानंतर जयवंत मल्टीस्टेटच्या माध्यमातून पैसे भरण्यात आले. त्यानंतर सोमवारची सुनावणी झाली. त्यात आता पुढील तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत काय होणार हे पहावे लागणार आहे. याशिवाय बारामती ऍग्रोने केलेल्या याचिकेवर शुक्रवारी (ता. २६) सुनावणी होणार आहे. त्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
