पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत 26 सप्टेंबरपर्यंत सूचना द्या

सोलापूर : पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडयामध्ये समाविष्ट कामाबाबत खासदार, आमदार, मंदीर समितीचे विश्वस्त, पालखी सोहळयाचे विश्वस्त, व्यापारी प्रतिनिधी, पत्रकार व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा झाली. आराखड्याबाबत आणखी काही सूचना असतील तर लेखी स्वरूपात 26 सप्टेंबरपर्यंत देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement

आराखड्याबाबत लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पालखी सोहळा प्रमुख, नागरीक, व्यापारी संघटना, वारकरी, पत्रकार यांना सूचना करावयाच्या असल्यास लेखी स्वरुपात eotemple@gmail.com व dpodpcslpur11@gmail.com या इमेलवर 26 सप्टेंबरपर्यत पाठवाव्यात. तसेच पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडयाची प्रत मंदिर समिती कार्यालय, तुकाराम भवन, पंढरपूर, पंढरपूर नगरपालिका, मंगळवेढा नगरपालिका, उपविभागीय कार्यालय अकलूज येथे अवलोकनार्थ उपलब्ध आहे. याठिकाणीही लेखी स्वरूपात सूचना देता येतील, असेही शंभरकर यांनी सांगितले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठया प्रमाणात भाविक येत असतात. त्याचबरोबर आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या चार प्रमुख यात्रा भरतात. पंढरपूरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मंदिरातील मूळ वास्तूचे जतन करुन मंदीर व मंदीर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, वाहनतळ, शौचालये, विद्यूत विकास, पालखीतळ विकास, चंद्रभागा नदी तीरावर दोन्ही बाजूस घाटाचे बांधकाम, वारी कालावधीत गर्दी व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वीत करणे आदी बाबींचा समावेश असणार आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात येणा-या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, पालखी सोहळा प्रमुख, नागरीक, व्यापारी संघटना, वारकरी, पत्रकार यांच्या सूचनांचाही विचार करण्यात येणार आहे, असेही शंभरकर यांनी सांगितले आहे. आराखड्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास, पंढरपूर शहरातील विकास कामे, संत नामदेव महाराज स्मारक, संत चोखामेळा महाराज स्मारक, पालखीतळ विकास, प्रशासकीय बाबी इत्यादीचा समावेश करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *