करमाळा (सोलापूर) : एसटी कर्मचारी व प्रवाशी वाऱ्यावर सोडून 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घोषणा फसवी आहे, अशी टीका राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन झिंजाडे यांनी केली आहे.

झिंजाडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनकरण करण्याचे स्वप्न तत्कालीन विरोधकांनी म्हणजे आताच्या सत्ताधाऱ्यांनी दाखवले होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनकरण करणे ही या सरकारची जबाबदारी आहे. विलिनीकरण्याच्या मुद्द्याला जाणीवपूर्वक बगल देऊन शिंदे फडणवीस सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे.

एसटीचे मजबुतीकरणासाठी, ‘प्रवाशांच्या सोईंसाठी कोणतेही ठोस पाऊल न उचलता 75 वर्षावरील नागरिकांसाठी एसटीचा मोफत प्रवास’, अशी फसवी घोषणा केली आहे. 75 वर्षावरील किती लोक घराबाहेर पडतात हे आधी सरकारने तपासायला पाहिजे होते. या सरकारला लोकांचा खरंच कळवला असेल तर 50 वर्षे पुढील नागरीकासाठी एसटी प्रवास मोफत करावा. तसेच एसटीचे शासनात विलीनकरण करावे, अशीही मागणी त्यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
