Video : माजी आमदार पाटील यांचे मोठे विधान! ‘आदिनाथ’साठी बागल व पाटील एकत्र काम करणार

It will be decided to work together in the future to start Adinath

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. त्यातच बागल गटाच्या संचालकांची काल (शनिवारी) करमाळ्यात बैठक झाली होती. त्या बैठकीला पाटील गटाचे संचालक उपस्थित नव्हते. त्यावरून करमाळ्यात चर्चा रंगल्या होत्या. त्यावर माजी आमदार नारायण पाटील यांनी स्पष्टीकरण देत ‘आदिनाथ सुरु करण्यासाठी भविष्यकाळात एकत्र काम करण्याचे ठरेल आहे,’ असे विधान केले आहे.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी रविवारी (ता. २८) अभिषेक करण्यात आला. तर बागल गटाच्या संचालकांची बागल यांच्या संपर्क कार्यालयात बैठक झाली. याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते सांगोबा येथे आदिनाथ मंदिरात अभिषेक झाला. बागल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला माजी आमदार पाटील गटाचे संचालक उपस्थित नव्हते तर आदिनाथ कारखान्यावर झालेल्या अभिषेकावेळी कारखान्याचे अध्यक्ष धंनजय डोंगरे नव्हते.

माजी आमदार नारायण पाटील, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, शिवसेना जिल्हाप्रमुख चिवटे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून हा कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. दीपक चव्हाण यांनी विधानभवनात सहकार मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले होते. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मदत केली असल्याचे पाटील सांगत आहेत.

तीन वर्षापासून बंद असलेला आदिनाथ साखर कारखाना सुरू करण्यासाठी माजी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत कारखाना स्थळावर अभिषेक झाला. यावेळी हरिदास डांगे, प्राचार्य जयप्रकाश बिले, करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे, साडेचे माजी सरपंच दत्तात्रय जाधव, डॉ. वसंतराव पुंडे उपस्थित होते. तेथील कार्यक्रम झाल्यानंतर माजी आमदार पाटील यांनी माध्यमांशी सवांद साधला.

तेव्हा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना पाटील म्हणाले, ‘आदिनाथ कारखाना सुरू होणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. कारखाना सुरू करण्यासाठी आम्हाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सहकार्य केले आहे. कारखाना सुरू करण्यासाठी बँकांनीही आम्हाला मदत करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे आम्ही हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आदिनाथ कारखाना सुरू करण्यासाठी बागल गटाच्या संचालकांनी त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती. यावेळी पाटील गटाचे संचालक उपस्थित नव्हते. यावर स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले, ‘आदिनाथ कारखाना सुरू व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आदिनाथसाठी भविष्यात आम्ही एकत्र काम करणार आहोत. संचालकांच्या भविष्यात आणखी बैठकी होतील.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *