राज्यात महामार्गावर 610 अपघातप्रवण ठिकाणे आहेत. त्यात करमाळा तालुक्यात नगर- जातेगाव- टेंभुर्णी महामार्गावर कंदर चौक, कविटगाव वळण, जेऊर पूल, कुंभेज फाटा, देवळाली, मौलाली माळ व मांगी पूल ही सात ठिकाणे आहेत. गेल्या काही दिवसात अपघात वाढल्याने अपघात प्रवण ठिकाणेही वाढली आहेत.

राज्यभरात दरवर्षी रस्ता अपघात वाढत आहेत. सातत्याने ‘त्याच’ ठिकाणी अपघात होऊन मृत्यूचे प्राणी प्रमाण अधिक असते. त्याला अपघात प्रवण ठिकाणे म्हणतात. राज्याच्या अन्य जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात 58 अपघातप्रवण ठिकाणे आहेत. महामार्गाची कनेक्टीव्हीटी वाढल्याने वाहनांचा वेग देखील वाढला आहे. वाहनधारकांना अपघात प्रवण ठिकाणाची माहिती नसल्याने अनेकदा त्याच ठिकाणी अपघात होत आहेत.

करमाळा तालुक्यात कंदर चौक येथे गेल्या काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला वाहनाने चिरडले होते. तर कांदरजवळच आणखी एका अपघातात दोन मुलं ठार झाली होती. एसटी आणि मोटारसायकलची धडक झाली होती. कुंभेज फाटा येथेही अपघातांची मालिका सुरु आहे. मांगी पूल येथेही काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यात देवळाली येथील तरुण ठार झाला होता.

सोलापूर शहरात 21 तर ग्रामीण हद्दीत महामार्गावर 37 अपघातप्रवण ठिकाणे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीची बैठक अपेक्षित आहे. तर खासदारांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक सर्वसाधारणतः महिन्यातून एकदा व्हायला हवी. पण अनेकदा वेळेवर बैठका होत नाहीत. अपघातानंतर तेवढीच डगडूजी केली जाते पण वाढलेले अपघात चिंताजनक आहेत. संबंधित यंत्रणांनी व्यवस्थित जबाबदारी पार पडणे आवश्यक आहे. करमाळा तालुक्यात टेंभुर्णी- जातेगाव- नगर या महामार्गावर सतत अपघात झालेले आहेत.