करमाळा (सोलापूर) : एकीकडे आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जोरदार इन्कमिंग होत असताना त्यांच्याच गटातून साडे येथील एक मोठा कार्यकर्ता बाहेर पडत आहे. बाहेर पडण्याचे कारण त्यांनी अद्याप सांगितले नसले तरी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर शिंदे गटाला हा धक्का मानला जात आहे.
पांडे गटात काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात यावी : ऍड. गपाट

साडे येथील दत्तात्रय जाधव यांनी माजी आमदार शिंदे गटाला रामराम करत माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे पाटील गटात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु असून त्यांनी गट सोडू नये, अशी अपेक्षा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व शिंदे समर्थक चंद्रकांत सरडे यांनी ‘काय सांगता’ या न्यूज पोर्टलशी बोलताना व्यक्त केली आहे.

साडे येथील जाधव यांच्या पत्नी जयाताई जाधव या करमाळा पंचायत समितीच्या माजी सदस्या आहेत. साडे भागात प्रभाव असलेला नेता म्हणून जाधव यांची ओळख आहे. प्रवेशाबाबत बोलताना जाधव म्हणाले, ‘माझा निर्णय झालेला आहे. प्रवेश कधी करायचा हे अद्याप ठरलेले नाही. २-४ दिवसात याची घोषणा केली जाणार आहे.’

शिंदे गट सोडू नये म्हणून काय प्रयत्न होत आहे का? यावर बोलताना जाधव म्हणाले, ‘तसे प्रयत्न होत आहेत. काहीजणांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता निर्णय झालेला आहे. याची लवकरच घोषणा केली जाणार आहे.’ शिंदे गटाच्या नाराजीबद्दल मात्र त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही.

जाधव यांच्या नाराजीबद्दल बोलताना शिंदे समर्थक सरडे म्हणाले, ‘जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांनी गट सोडू नये म्हणून प्रयत्न सुरु आहे. त्यांची काही नाराजी दूर केली जाणार आहे. आमदार संजयमामा सध्या बाहेर आहेत. त्यांच्याबरोबर एखादा बैठक घेतली जाणार आहे.’