करमाळा (सोलापूर) : न्यायालयात आल्यानंतर पक्षकाराची फी आणि वेळ वाया जातो. येथे फक्त निर्णय मिळत असतो पण सुख आणि चैन तुम्ही गमावलेली असते. कौटुंबिक वादातील प्रकरणात नवरा बायको, माहेरचे आणि सासरचे अशा तीन कुटुंबात एका चुकीमुळे दुरावा येत असतो. त्यामुळे न्यायालयात येण्यापूर्वी तडजोड करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन करतानाच गरिबांकडे पैसे नाहीत म्हणून ते न्याय मागू शकत नाहीत, असेही नाही. त्यांना मोफत मार्गदर्शन करण्याची व्यवस्थाही केलेली असते, असे न्यायाधीश मीना एखे यांनी सांगितले.
पोथरे येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाने करमाळा तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ यांच्या वतीने शनिवारी (ता. 24) शनैश्वर मंदिराच्या प्रांगणात कायदेविषयक शिबिर झाले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष व्ही. ए. जरांडे, ऍड. बाबुराव हिरडे, ऍड. अमर शिंगाडे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भूजबळ, सचिव ऍड. शिंपी, ऍड. राहुल सावंत, पोलिस पाटील संदीप पाटील आदी उपस्थित होते. पोथरे येथील कार्यक्रमानंतर आळजापूर, कामोणे व बिटरगाव श्री येथे जनजागृतीसाठी पत्रक वाटप करण्यात आले.

न्यायाधीश एखे म्हणाल्या, कौटुंबिक वादामध्ये एकदाची चूक झाली असेल तर त्याला समजून सांगण्याची जबाबदारीही कुटुंबातील व्यक्तीची आहे. न्यायालयात आल्यानंतर पक्षकाराची फी आणि वेळ वाया जातो. यातून तुम्हाला फक्त निर्णय मिळत असतो. न्यायालय हे तुमच्यासाठीच आहे पण न्यायालयात येण्यापूर्वी तडजोड करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. गरिबांकडे पैसे नाहीत म्हणून ते न्याय मागू शकत नाहीत, असेही नाही. त्यांना मोफत मार्गदर्शन करण्याची व्यवस्थाही केलेली असते.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, न्यायालयात खटले दाखल होतात. त्यानंतर साक्षी पुरावे पाहून न्यायाधीश निर्णय देत असतात. खटल्याची संख्या दिवसांदिवस वाढत आहे, असे सांगतानाच न्यायाधीश मीना एखे म्हणाल्या, करमाळा न्यायालयात दोन न्यायाधीश आहेत. त्यांच्याकडे साधारण ४ हजार खटले आहेत. त्यातील सुमारे १०० खटले रोज बोर्डावर येत असतात. त्यातून सर्वच नागरिकांना न्याय देणे शकत नसते. त्यात खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यामुळे निकालाला विलंब लागतो. पक्षकारांचा त्यात वेळ आणि पैसे जातात. काही गुन्ह्यामध्ये महिलांच्या कायदाचा गैरवापर केला जातो. यातून विनाकारण समोरच्याला मानसिक त्रास सहन करावा लागतो. कायदा वाटतो तेवढा सहज आणि सोपा नाही. यातून काहींचे आयुष्य उध्वस्तही होऊ शकते. कौटुंबिक वादामध्ये अनेकांचे संसार बिघडतात. बऱ्याच समाजात घटस्फोट झाल्यानंतर मुलीचा पुन्हा विवाह करण्याची प्रथा नाही. त्यामुळे संसार उध्वस्त होतात.

लोकन्यायालयाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, लोकन्यायालयात दोघेही विजयी झालेले असतात. त्यात कोणाचाही पराभव झालेला नसतो. ती एक तडजोड असते. दोन्हीही पक्षकार आंनदी असतात. त्यात आम्हालाही आंनद असतो. नागरिकाला कायद्याची पूर्ण माहिती नसली तरी त्याचा तो वापर करत असतो. पूर्वी गावातील ज्येष्ठ मंडळी सांगेल ते ऐकले जायचे. तेथे एकमेकांचा आदर सन्मान केला जात होता. त्यांच्यापुढे खटले चालले जात होते. त्याचेच आधुनिक स्वरूप म्हणजे न्यायालय आहे, असेही त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकमध्ये अॅड. डॉ. हिरडे म्हणाले, पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना जशी आहे तशी गावातला वाद गावात मिटावा अशी फिरते न्यायालय ही संकल्पना आहे. पूर्वी न्यायाधीश आपल्याला माहित नसत. पण आता न्यायालय आपल्या घरी येत आहे. पंच जसे असतील तसे गाव असते. गावातील वाद हा गावात मिटला पाहिजे म्हणून ते काम करत असतात. वाद निर्माण होऊ नयेत म्हणून कायदा समजला पाहिजे. या शिबीरातुन कायद्याचे ज्ञान देण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. व्ही. जे. चौरे यांनी महिलांविषयक कायद्याची माहिती सांगितली. महिलांना कायद्याने संरक्षण दिले आहे. हुंडा प्रतिबंध कायदा, गर्भलिंग निदान कायदा, रोजगार हमी कायद्याची माहिती देत त्यांनी महिला आयोगाचीचीही माहिती दिली. महिलांसाठी असलेल्या कायदाचा दूरोपयोग होऊ नये याचीही खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
अॅड. प्रशांत बागल यांनी ‘रस्ता केस’ कायद्याबाबत माहिती सांगितली. रस्त्यासाठी अर्ज करताना व्यवस्थित करा शक्यतो गावातच अशी तक्रार मिटवा, असे ते म्हणाले. अॅड. स्मिता पाटील यांनी बाल लैंगिक कायद्याची माहिती सांगितली. यामध्ये 18 वर्षाखालील मुलांची नावे गुप्त ठेवले जातात. या कायद्याचा लाभ घ्या, असे त्यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक भुजबळ म्हणाले, भांडण झाल्यानंतर खरंच अन्याय झाला असेल तर पोलिसात तक्रार करा. कायद्याचे प्रत्येकाने पालन केले तर वेळ जाणार नाही. मात्र कायदा सुव्यवस्था बिगडवण्याचे कामही कोणी करु नये.
वकिल संघाचे सचिव अॅड. शिंपी, म्हणाले, कायदा हे दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे समाजात वावरताना आपली दृष्टी बदलली पाहिजे. कायद्याचा विपर्यास न करता त्याचा वापर केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. अॅड. राहुल सावंत म्हणाले, गावातले वाद गावातच मिटवावेत हीच या शिबिराची संकल्पना आहे. तडजोडीने वाद मिटले तर कोर्टाचा वेळ व वाद असलेल्या व्यक्तीचा पैसा वाचेल. समंजसपणे वाद मिटले तर तुमचेच संबंध सलोख्याचे राहतील, असे ते म्हणाले. अॅड. एन. एस. शिंदे यांनी सुत्रसंचालन केले.