करमाळा (सोलापूर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांवर हल्ला करण्याचा यापुढे कोणी प्रयत्न केला तरी त्याची गय करू केली जाणार नाही. त्याला जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शिंदे समर्थक शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी करमाळ्यात बुधवारी (ता. 3) मध्यमांशी बोलताना दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याचा करमाळ्यात शिंदे गटाचे समर्थकांकडून निषेध करण्यात आला. बुधवारी (ता. 3) तहसीलदार समीर माने व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना निवेदन देऊन या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिंदे गटाचे संजय शिलवंत, राजेंद्र काळे, कोळगाव येथील नागेश चेंडगे, हिवरवाडीचे आजिनाथ इरकर, संजय जगताप, राजेंद्र मेरगळ, संजय भोसले, प्रदीप बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. दोषींवर कडक कारवाई झाली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

चिवटे म्हणाले, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे आमदार सामंत यांच्यावर कात्रज येथे झालेला भ्याड हल्ला निंदनीय आहे. राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर नाचणारी शिवसेना ठाकरे यांना कधीच मान्य झाली नसती. शिवसेना वाचवायची असेल तर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही.

शिंदे यांना प्रचंड पाठिंबा मिळत असून त्यांच्या कामाचा सपाटा व वेग पाहून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. यामुळे सैरभैर झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे भगवे उपरणे पांघरून आमदार सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रकार केला. आमदार सावंत यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा असताना पोलिसासमक्ष त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार निंदनीय असून या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, असे चिवटे यांनी म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री ठाकरे व ठाकरे यांनी शिंदे व त्यांच्या समर्थकांना गद्दार म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. ठाकरे कुटुंबाबद्दल हृदयात असलेला मानसन्मान यामुळे आजपर्यंत कुणीही त्यांच्यावर टीका टिप्पणी करत नाहीत. मात्र संयमाचा बांध सुटल्यानंतर शिंदे समर्थक जशास तसे उत्तर देतील, असा इशारा त्यांनी दिला.
