करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पाडळी येथे सोमवारी (ता. 12) ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसाने बळीराम शिंगटे यांच्या वस्तीकडे जाणार्या रस्त्यावरील ओढ्याला पाणी आल्याने शाळेतील सुमारे 20 मुलं व कामासाठी शेतात गेलेल्या महिला व पुरुष कामगार अडकले होते. त्यांना ट्रक्टरला दावे बांधुन बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी तेथील वस्तीवरील सर्वजन मदतीला धावले. हा रस्ता महत्वाचा असून ओढ्यावर पुल बांधून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
पाडळीपासून तरटगावकडे येणार्या रस्त्यावरुन साधारण एक किलोमीरपासून जवळ्याकडील बाजूला एक किलोमिटरवर (गावापासून दोन किलोमीटर) बळीराम शिंगटे यांची वस्ती आहे. येथून रोज शाळेसाठी साधारण 20 मुले गावात येत आहेत. पहिलीपासून 7 वी पर्यंतची ही मुले आहेत.

सोमवारी जोरदार पाऊस आल्याने ओढ्याला पाणी आले. त्यामुळे शाळेतुन घराकडे येताना मुले व शेतकरी अडकले होते. पाणी जास्त असल्याने त्यांना ओढ्यातून घराकडे येता येत नव्हते त्यामुळे श्रीराम शिंगटे, आबा जाधव, शिवाजी जाधव, शामराव जाधव, दगडू भोरे, महेश बोबलट, माऊली शिंगटे यांनी त्यांना मदत करुन सुखरुपपणे बाहेर काढले.

तीन वार्षापूर्वी या रस्त्याचे आर्धा किलोमीटरचे काम झाले होते. मात्र पुढे कामाचे काय झाले हा त्यांचा प्रश्न आहे. आता रस्त्यावर पुल करावा अशी त्यांची मागणी आहे. गावाच्या खालच्या म्हणजे धोत्रीकडील बाजूने असलेल्या माळावरुन या ओढ्याला पाणी येते. ते पाणी नान्नी नदीला मिळते.

यावर्षी पहिल्यांदाच दिवसा पाऊस होऊन लोक आडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला आसल्याचे नागरिक सांगत आहेत.