कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशीच ही निवडणूक झाली. उद्धव ठाकरे यांचे शिवसेना नाव आणि धन्युष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये कसब्यात भाजपचा तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीच्या निमित्ताने हा निकाल महत्वाचा मानला जात आहे. या निकालाची सर्वत्र चर्चा आहे. करमाळा तालुक्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

धंगेकरांचा विजय हा सामान्या जनता
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप म्हणाले, ‘रवींद्र धंगेकरांच्या रूपाने काॅग्रेसची विजयाची घोडदौड अशीच सुरु राहील. काॅग्रेसला संपवण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी क्रांती ही पुण्याच्या मध्यवर्ती भागातुन घडली आहे. अगदी लोकमान्य टिळकांपासुनची उधारणे आहेत. जे मध्यवर्ती पुण्यात होते तेच हळु- हळु संपुर्ण महाराष्ट्रात झाले आहे आणि पुढेही गतिमानतेने सुरू राहील. धंगेकरांचा विजय हा सामान्या जनता, बेरोजगार युवक युवती व्यापारी यांनी दिलेला जातीयवादी शक्ती आणि महागाईच्या विरोधातला कौल आहे.

मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल म्हणाले, कसब्यात मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप या विजयी झाल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट हे तीन पक्ष एकत्र असताना आम्ही तेथे विजयी मिळवला आहे. झालेल्या चुका नक्कीच सुधारल्या जातील. त्यादृष्टीने योग्य काम केले जाईल.
रवींद्र धंगेकरांच्या रूपाने काँग्रेसची विजयाची घोडदौड अशीच सुरु राहील
खरे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याबरोबर
ठाकरे गटाचे शंभूराजे फरतडे म्हणाले, कसबा विधानसभा मतदार संघ हा भाजप आणि शिवसेना यांचा ४० वर्षांपासूनचा गड मानला जातो. मात्र ठाकरे गटाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर ही पहिली निवडणूक झाली. त्यात खरे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असून मुख्यमंत्री यांच्याकडे गेलेले नाहीत. हेच या निकालावरून दिसत आहे. २०२४ च्या निवडणुकीत असेच चित्र राहणार असून त्याचा हा ट्रेलर आहे.
कसब्यात महाविकास आघाडीचे धंगेकर विजयी
चिंचवडमध्ये महाविकास आघाडीने चांगली लढत दिली
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे म्हणाले, कसब्यात झालेला विजयी हा जनतेचा विजय आहे. महागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत त्याचा हा परिणाम असून ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेले. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष असून मतदानातून त्यांनी दाखवून दिले आहे. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीने चांगली लढत दिली. मात्र तेथे बंडखोरी झाल्याचा परिणाम झाला. याशिवाय जगताप यांच्याबाजूने सहानुभीतीचा फायदा भाजपला झाला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागत आहोत. निवडणुका आता जनता हातात घेऊ लागली आहे यावरून दिसत आहे.