करमाळा (सोलापूर) : कोरोनानंतर यावर्षी प्रथमच करमाळ्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री देवीचामाळ येथील कमलाभवानी मंदिर येथे नवरात्रोत्सव होत आहे. याची ग्रामपंचायतीच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात चिमुकल्यांसाठी पर्वणीच समजली जाते. पाळणे, खाऊचे स्टॊल येथे लागतात. दोन वर्षांनंतर हा उत्सव होणार असल्याने भाविकांची जास्त असू शकेल हा अंदाज घेऊन देवस्थानने व्यवस्था केली आहे. त्यात यावर्षी पहिल्यांदाच येथे जंपिंग बोटीचा आनंद घेता येणार आहे.

सोमवारी परंपरेनुसार येथे घटस्थापना होऊन उत्सवाची सुरुवात होणार आहे. करमाळा शहरासह ग्रामीण भागातून येथे मोठ्याप्रमाणात भाविक येतात. त्यात चिमुकल्यासह हैसी भाविकांना खाऊसह मोठ्या पाळण्यात बसण्याचा, रेल्वेत बसण्याचा, जंपिंग बोट, नावेत बसण्याचा आनंद घेतात. यावर्षी साधारण ५० स्टोल येथे आहेत. सर्व स्टॊलची संख्या १५० च्या आसपास आहे. ग्रामपंचायतीने प्रत्येकाला जागा मिळेल असे नियोजन केले आहे. त्यांना वीज, पाणी, स्वछतागृह व निवासाची व्यवस्था करून दिली आहे, अशी माहिती सरपंच महेश सोरटे यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी येथील ९६ पायरीच्या विहिरीत एक वारकरी पडला होता. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा घटना होऊ नयेत म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. ही विहीर सर्व बाजूने बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विहिरीच्या कट्ट्यावर जाता येणार नाही. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून येथे खंडोबा मंदिर येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनानेही सर्व सहकार्य केले असून हा उत्सव यशस्वी व्हावा म्हणून भाविकांनी व स्टॊल धारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच सोरटे यांनी केले आहे.

श्री देवीचामाळ ते करमाळा या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत व करमाळ शहर व तालुक्यातील भक्तजनांच्या मागणीनुसार रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांना पत्र व्यवहार करण्यात आला होता. उपसरपंच दीपक थोरबोले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन चोरमले, ग्रामपंचायत सदस्य संतोष पवार, अमोल चव्हाण, सचिन शिंदे, कमलाभवानी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विवेक येवले यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देऊन व रातोरात या रस्त्याचे काम करण्यात आले आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
