करमाळा (सोलापूर) : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हायरल पोस्ट प्रकरणात दाखल झालेला गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा यासह ‘त्या’ पोस्टमधील सात प्रश्नांची चौकशी करण्यात यावी, याची मागणी आमदार संजयमामा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यानी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत करमाळ्याचे तहसीलदार समीर माने व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर विवेक येवले, बालाजी गावडे, राकेश वारे आदींच्या सह्या आहेत.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून बदनामी केली असल्याचा आरोप करत पाटील गटाचे नेते माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून आमदार शिंदे गटाचे समर्थक विवेक येवले, बालाजी गावडे, अनिल पाटील, राकेश पाटील, आप्पा अरणे, उमेश पाथरुडकर व आजीनाथ माने या सात जणावर संशयित आरोपी म्हणून गुरुवारी (ता. 25) करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल होताच शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर शुक्रवारी (निवेदन देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. करमाळा येथील दत्त मंदिरापासून कार्यकर्ते मोटारसायकलने एकत्र आले. त्यांनतर हे निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार विजयकुमार जाधव व पोलिस उपनिरीक्षक मिटू जगदाळे यांनी निवेदन स्विकारले.

या निवेदनात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हायरल पोस्टमधील सहा मुद्याची चौकशी करण्याची मागणी केली. सातवा मुद्दा हा गुन्हा दाखल झालेल्या तक्रारीची सकांक्षकीत प्रतची मागणी केली आहे. सर्व मुद्यांची चौकशी करून दाखल झालेला गुन्हा माघारी घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.