करमाळा (सोलापूर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महेश चिवटे यांची शिवसेनेच्या (शिंदे गट) जिल्हा प्रमुखपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले तेव्हापासूनच चिवटे हे त्यांच्याबरोबर होते. शिवसेना उपप्रमुख असताना त्यांनी अतिशय ठामपणे ते भूमिका मांडत होते. त्यांनी नुकतीच करमाळा तालुक्यात कार्यकरणीही जाहिर केली होती. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच्या दुसर्याच दिवशी चिवटे यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचा शिंदे यांच्याशी थेट संपर्क आहे.

चिवटे यांची शिंदे गटाचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी नियुक्ती केली आहे. बुधवारी त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले आहे. माढा, करमाळा व माळशिरस या तालुक्यांमध्ये त्यांचे कार्यक्षेत्र असणार आहे. एक वर्षासाठी त्यांची ही निवड असणार आहे.

शिंदे यांनी बंड करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेत चिवटे हे उपजिल्हा प्रमुख होते. मात्र तेव्हाही ते मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक होते. काही दिवसांपूर्वीच शिंदे यांचे चिरंजिव खासदार श्रीकांत शिंदे यांनी करमाळा दौरा केला होता.

चिवटे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते मानले जातात. मुख्यमंत्री शिंदे हे आषाढी एकादशीनिमीत्त पंढरपूरला आले होते तेव्हाही तेथे चिवटे उपस्थित होते.
करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्यासाठी त्यांनी मंत्री तानाजी सावंत व शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. चिवटे यांच्या निवडीमुळे आणखी यात पाठपुरावा होऊ शकतो.