करमाळा (सोलापूर) : मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे आरोग्य क्षेत्रात अतिशय महत्वाचे काम आहे. रुग्णसेवेच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचत आहेत, असे गौरवोद्गार काढत आमदारांचे बजेट कमी करुन आरोग्याचे बजेट वाढवले तरी चालेल, असे प्रतिपादन आमदार बचू कडू यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे मंगेश चिवटे यांचा करमाळा येथे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख म्हणून निवड झाल्यामुळे नागरी सत्कार करण्यात आला. करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात मंगळवारी (ता. ६) त्यांचा सत्कार झाला. यावेळी माजी आमदार नारायण पाटील, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, प्रा. शिवाजी सावंत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख (शिंदे गट) महेश चिवटे, पत्रकार राजा माने, जगदीश अग्रवाल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, सावंत गटाचे सुनील सावंत, राजेंद्र बारकुंड, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, अमरजित साळुंखे, डॉ. अमोल घाडगे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार कडू म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर मंत्रालयात वैद्यकीय कक्ष सुरु केला. रुग्णसेवा ही अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे आमदारांचे बजेट कमी करुन आरोग्याचे बजेट वाढवले तरी चालेल. पुढे बोलतं ते म्हणाले, अपंग कल्याण मंत्रालय सुरु केल्याशीवाय आपण राहणार नाही. कारण अपंगाचा अशिर्वाद हा सिंहाच्या वाट्याप्रमाणे असतो. मंत्री मंडळ विस्तार लवकरच होणार असून त्यात आपंग मंत्रालय नक्की असणार असेहे ते म्हणाले आहेत.

