करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मांगी तलावाची १०० टक्के भरण्याकडे वाटचाल सुरु आहे. हा तलाव भरून सांडव्यातून पाणी पडू शकते त्यामुळे कान्होळा नदी काटाच्या शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, अशी सूचना तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे. गेल्या चार- पाच वर्षात पहिल्यांदाच हा तलाव ओहोरफ्लो होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मांगी तलाव एक ते दोन दिवसात भरू शकतो. त्यानंतर सांडव्याद्वारे कान्होळा नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावध रहावे. याबाबतचे पाटबंधारे उपविभागाने तहसीलदर माने यांना कळवले आहे. त्यावरून माने यांनी या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. मांगी तलावात कुकडी ओहोरफ्लोचे पाणी सोडण्यात यावे म्हणून बागल गटाचे नेते दिग्विजय बागल व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने आंदोलने करण्यात आली होती. दरम्यान तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने हा तलाव भरला आहे.

