नुकताच ‘नीट’चा निकाल लागला आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे यांची पुतणी मानसी हिने यश मिळवले आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या या छोट्याश्या गावात प्राथमिक शिक्षण घेऊन दहावीपर्यंत कोणताही क्लास न लावता तिने यश मिळवले. या यशाबाबद्दल सुहास गलांडे यांनी फेसबुकवर तिचे अभिनंदन केले आहे.
गलांडे यांनी म्हटले आहे की, माझा लहान भाऊ श्रीपती किसनराव गलांडे (तात्या) याची मुलगी म्हणजे माजी पुतणी मानसी हिने नीट (NEET) परीक्षेत ६०७ गुण प्राप्त केले. जिल्हा परिषद शाळेमधून तिने शिक्षणाचा श्रीगणेशा केला. दहावीपर्यंत कोणत्याही ट्युशनशिवाय तिने हे यश संपादन केले. ग्रामीण भागामध्ये सुद्धा राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत विद्यार्थी आपले अस्तित्व निर्माण करू शकतात याचा वस्तुपाठ मानसीने आपल्या यशाने घालुन दिला.

मानसीने (राणी) तिच्या यशाने कुटुंब व गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शिक्षणक्षेत्रामध्ये आमच्या घराण्याची यशाची वैभवशाली परंपरा राणीने वृद्धिंगत केली. तात्या सुद्धा प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीचा मानकरी आहे. तात्याने शेतीमध्ये सातत्याने प्रामाणिकपणे निष्ठेनेजे अविरत कष्ट केले त्या कष्टाचे राणीच्या यशाने सार्थक झाले. आमच्या आई- वडिलांनी घालुन दिलेल्या संस्कार व शिकवणुकीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन प्रामाणिकपणे कष्ट करून जगण्याचे फळ राणीच्या यशाने आमच्या कुटुंबाला मिळाले.


राणीने आई- वडीलांच्या (रेखा व तात्या) कष्टाची ठेवली जाण…
सतत ठेवले अभ्यासाचे भान…
म्हणुन परमेश्वराने तिला दिले यशाचे दान…
त्यामुळे आमच्या कुटुंबाची वाढली शान…
मानसीच्या यशामध्ये जिल्हा परिषद शाळा कोंढारचिंचोली, आदर्श विद्यालय भिगवण, दत्तकला इन्टरनॅशनल स्कुल, भिगवण या संस्था व येथील शिक्षक यांचा सिंहाचा वाटा आहे. लातुर येथील मोटेगावकर क्लासचे मोलाचे मार्गदर्शनाखाली मानसी राणीने अभ्यासामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत हे तिच्या यशाचे गमक आहे.



मानसीच्या यशाबद्दल ग्रामस्थांनी, मित्रमंडळी, आप्तेष्ट, सहकारी या सर्वांनी केलेल्या कौतुकामुळे आमच्या कुटुंबांचा आनंद वृद्धींगत केला. त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. पुन्हा एकदा राणीचे हार्दिक अभिनंदन!