मंत्री डॉ. सावंत यांना विरोधी पक्षनेते पवार यांनी विधिमंडळात घेरले; परिपूर्ण माहिती नसल्याने प्रश्न राखून ठेवण्याची शिंदे सरकारवर नामुष्की

Minister Tanaji Sawant was surrounded by opposition leader Ajit Pawar in the legislature

मुंबई : पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रादुर्भावासंदर्भात आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे परिपूर्ण माहिती नसल्याने प्रश्न राखून ठेवण्याची गुरुवारी (ता. १८) सरकारवर नामुष्की आली. यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मंत्री सावंत यांना सभागृहात चांगलेच धारेवर धरल्याचे चित्र होते. पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात सभागृहात प्रश्नांचा भडीमार केला. त्याची उत्तरे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांना देता न आल्याने, शिंदे सरकारच्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की आली. या प्रश्नाचं उत्तर आता सरकारकडून सोमवारी दिले जाणार आहे.

विरोधी पक्ष नेते पवार यांनी पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी याबाबत सरकारला प्रश्न विचारले. ही माहिती आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्याकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे सोमवारपर्यंत उत्तर राखून ठेवण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न गंभीर आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातल्या ८० बालकांना रोगाची लागण झाल्याचे आढळून आले. डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील २९ बालकांना या रोगाची लागण झाली. यासंदर्भात प्रश्न विचारताना पवार म्हणाले, हत्तीरोग गंभीर असून त्यामुळे शरीर विद्रुप व अकार्यक्षम होते. लागण झाल्यावर या आजारावर परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. याकडे लक्ष वेधून त्यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्षम होण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावर आरोग्यमंत्री सावंत यांना उत्तरे देता आली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *