करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानपरिषदेचे भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने वर्चस्व प्रस्थापित करत विजय मिळवला त्यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या याबद्दल त्यांचे अभिनंदन केले असल्याचे या भेटीनंतर आमदार मोहिते पाटील यांनी सांगितले आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर माळशिरस मतदारसंघाचे भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मोहिते पाटील यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे. मोहिते पाटील यांच्यावर लोकसभा निवडणुकीपासून संशय घेतला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने माढा लोकसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत ‘तुतारी’ हाती घेतली आणि निंबाळकरांचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही आमदार मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला जात असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी माजी आमदार राम सातपुते यांनी केली होती. त्यानंतर आमदार मोहिते पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.