सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होताच आता खातेवाटपाकडे व पालकमंत्रीपदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला स्थान मिळाले नसून आता पालकमंत्री म्हणून कोण येणार याची चर्चा रंगू लागली आहे. डॉ. प्रा. तानाजी सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असल्याने त्यांना सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक महेश चिवटे यांनी आमदार सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच आंनद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोलापूरचे पालकमंत्री म्हणून त्यांना संधी देण्यात यावे, असेही त्यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे. शिवसेना व भाजप युतीचे सरकार असताना (देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना) सावंत यांच्याकडे जलसंधारण हा विभाग होता.

फडणवीस यांच्या काळात सोलापूर जिल्ह्यात दोन मंत्रीपदे होती. त्यात सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख यांचा समावेश होता. तेव्हा विजयकुमार देशमुख यांच्याकडे पालकमंत्रीपद होते. त्यानंतर महाविकास आघाडी (उद्धव ठाकरे सरकार) सरकारमध्ये मात्र सोलापूरला एकही मंत्रीपद देण्यात आले नव्हते. साधारण अडीच वर्षाच्या कार्यकाळात तीन मंत्र्यांकडे सोलापूरचे पालकमंत्रिपद गेले होते. सुरुवातीला दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवस काम पहिले त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले तेव्हा दत्तात्रय बरणे यांच्याकडे पाल्कमंत्रीपदाची जबाबदारी होती.

आताही शिंदे सरकारमध्ये सोलापूरला मंत्रीपद न मिळाल्याने पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सावंत यांना मंत्री पद मिळाले असून त्यांना पालकमंत्री म्हणून संधी मिळू शकते. सोलापूर जिल्ह्याशी त्यांचा असलेला संपर्क पहाता त्यांचीच पालकमंत्री म्हणून वर्णी लागू शकते. सावंत यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही काम पहिले होते. शिवसेनेतील बंडावेळी त्यांनीही बंड केले आणि शिंदे यांच्याबरोबर सुरत मार्गे गुवाहाटी येथे ते गेले होते.

मंत्री सावंत यांनी महाविकास आघाडीत असतानाही राष्ट्रवादीवर घणाघाती टीका करत नाराजी व्यक्त केली होती. आता सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली तर शिंदे गट वाढवण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची वर्णी लागेल अशी शक्यता होती. मात्र आताच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालेले नाही. पुढील मंत्री मंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळणार का? हे पहावे लागणार आहे. मात्र आता पालकमंत्री म्हणून सावंत यांना संधी मिळू शकते, अशी शक्यता आहे.

