करमाळा (सोलापूर) : करमाळा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नविन मोजणी, वारस, नकाशा, उतारे यासाठी येणाऱ्या नागरिकांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी केला असून याबाबत त्यांनी तहसीलदार समीर माने यांना बुधवारी निवेदन दिले आहे.

मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी अनेकदा टेबलावर बसलेले दिसत नाहीत. चहा पिण्यास जाण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये तास- तास बसतात. त्यामुळे नागरीकांना ताटकळत थांबावे लागत आहे. यामुळे नागरीकांची अडवणूक होत आहे. एकदा ग्रामस्थाचे मोजणी करावयाची असल्यास त्यास प्रथम चलन तयार करुन बँकेमध्ये भरण्यास सांगातात व चिरीमिरी घेतल्याशिवाय चलन बँकेमध्ये भरण्यास देत नाहीत, असा आरोप त्यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

मोजणीमध्ये साधी मोजणी, तातडीची मोजणी व अति तातडीची मोजणी याबाबत दर ठरेल असतानाही मन मानेल तसे पैसे घेऊन त्यांच्या सोयीनुसार मोजणी करतात व आमच्या ऑफीसमध्ये मशिन नाही, मशिन बाहेर गावावरुन मागवावी लागेल त्याचे पैसे वेगळे दयावे लागले असे अधिकारी सांगतात. ज्यानी मोजणी रितसर अर्ज केले आहेत. त्यांची मोजणी वेळेमध्ये होत नाही, असेही मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे. कर्मचारी कार्यालयात येणाऱ्या ग्रामस्थांना अरेरावीची भाषा वापरतात याबाबत तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नव निर्माण सेना तिव्र अंदोलन करेल, असा इशारा मोरे यांनी दिला आहे.
