करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मध्यंतरी या रस्त्याची कामे बंद झाली होती. आता या रस्त्यांची काम करण्यासाठी तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात बैठक झाली आहे. लवकरच या रस्त्यांचे काम सुरु होईल, असे त्यांनी सांगितले आहे.

सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणंद रस्ते करण्यात यावेत म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर प्रशासनाकडून कामे सुरु करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. तहसीलदार माने यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता डी. पी. गौडरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे के. एम. उबाळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.

तालुक्यात सालसे, नेर्ले, बोरगाव, गौडरे, साडे, दिलमेश्वर, गुळसडी, रावगाव, फिसरे येथील २ रस्ते, पोटेगाव येथील २ रस्ते, हिवरवाडी व पोफळज येथील २ अशा १६ रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. तालुक्यात २६ किलोमीटरचे रस्ते होणार आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा (पीडब्ल्यूडी) यांच्या यंत्रणेकडून केली जाणार आहेत. संबंधित ग्रामपंचातीच्या ठरावानुसार रोजगार हमी योजनेअंतर्गत ही कामे होणार आहेत.