मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरु केला आहे. ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहीमअंतर्गत सात दिवसात विविध ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पडली. यामध्ये फेरीवाल्यांकडून सुमारे दोन हजार ७६३ साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. त्यात ५४४ चारचाकी हातगाड्या, ९६८ घरगुती गॅस सिलिंडर आणि १ हजार २५१ इतर विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे.

उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार बृहन्‍मुंबई महापालिका हद्दीतील वर्दळीची २० ठिकाणे फेरीवाला मुक्‍त ठेवण्‍याचे निश्चित करण्‍यात आले आहे. या अनुषंगाने, मुंबईकर नागरिकांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणाऱ्या तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सातत्याने कारवाई केली जात आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईविषयी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कार्यवाही सुरू आहे.

उप आयुक्‍त (विशेष) चंदा जाधव म्‍हणाल्‍या, मुंबईतील विविध विभागांमध्ये सात दिवसात झालेल्या कारवाईत चारचाकी हातगाड्या, सिलिंडर आणि स्टोव्ह, शेगडी, बाकडे, शॉरमा मशीन्स आदी जप्त करण्यात आले आहेत. नियमित कार्यालयीन वेळेखेरीज, दुपारी २ ते रात्री १० या कालावधीत दररोज ही अतिक्रमणविरोधी कारवाई करण्‍यात आली आहे. ही धडक कारवाई सातत्‍याने राबविण्‍यात येणार आहे.

या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या साधनसामुग्रीचा तपशील खालीलप्रमाणे-

जप्त साधनांची संख्या : २,७६३

  • चारचाकी हातगाड्या : ५४४
  • सिलिंडर : ९६८
  • स्टोव्ह, शेगडी, तवा, कढई, भांडी, लोखंडी बाकडे इत्यादी विविध प्रकारचे साहित्य : १,२५१

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *