करमाळा (सोलापूर) : कोरोनंतर यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. काल (बुधवारी) सार्वजनिक व घरोघरी लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. हा उत्सव साजरा करताना कायद्याचेही पालन करा, असे आवाहन करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना केले आहे.
करमाळा शहर व तालुक्यात १२६ मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले होते. त्या मंडळांना परवानगी दिली जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सुमारे ४२० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. नागरिकांनीही हा उत्सव साजरा करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक गुंजवटे यांनी केले आहे.

गणेशोत्सव काळात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला जाणार आहे. मोठी मंडळे आहेत त्यांनी महिलांसाठी व्यवस्था करावी याबरोबर मंडळाने काही स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. पावसात श्री गणेश मूर्तीला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊन सामाजिक बांधिलकी जपत हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक गुंजवटे यांनी केले आहे.

