सोलापूर : देशभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव घेण्यात येत असून बुधवारी (आज) सकाळी 11 वाजता जिल्हाभर एकाचवेळी समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे. समूह राष्ट्रगीत गायनात जास्तीत जास्त नागरिक, पदाधिकारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हा प्रशासन समूह राष्ट्रगीत गायन नियोजन भवन येथे सकाळी 11 वाजता करणार आहे. समूह राष्ट्रगीत गायन जिल्हा, तालुका, ग्रामस्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल यंत्रणा, सर्व विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, पोलिस यंत्रणा अशा सर्व यंत्रणांद्वारे होणार आहेत. समूह राष्ट्रगीत गायनात सामान्य नागरिकांनाही सहभागी करून घ्यावे. सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल व सकाळी ११ ते ११:०१ या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, याची सर्व संबधितांनी दक्षता घ्यावी. समूह राष्ट्रगीत गायनावेळी राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये, याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी, असे जिल्हा प्रशासन यांनी कळविले आहे.

खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक राहील.

राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली किंवा हॉल याठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभागी होणे आवश्यक राहील, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.