करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील तीन वर्षांपासून बंद असलेल्या श्री आदिनाथ कारखान्यांमध्ये काम करण्याची इच्छुकांना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, संचालिका रश्मी बागल व प्रभारी कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी केले आहे.
डॉ. लोणकर यांच्या श्री विश्ववंदन आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्राचे माजी सहकार मंत्री पाटील यांच्या हस्ते उदघाटन
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे न्यायालयात प्रकरण सुरु असताना संचालक मंडळांनी यावर्षीचा हंगाम सुरु करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. बागल गटाच्या संचालकांनी बागल यांच्या निवासस्थानी संचालकांची बैठक घेतली होती. तर आदिनाथ कारखान्यावर माजी आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत काम सुरु करण्यासाठी अभिषेक करण्यात आला होता. यावेळी हरिदास डांगे, प्राचार्य जयप्रकाश बिले, पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे, साडेचे माजी सरपंच दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

कारखाना सुरु करण्याची प्रक्रिया सुरु असताना बागल गटाचे व माजी आमदार पाटील गटाचे संचालक अजूनतरी जाहीरपणे एकत्र आले नसल्याचे दिसत आहे. मात्र मंत्री तानाजी सावंत यांनी बागल व पाटील गटाच्या संचालकांना कारखान्यासाठी एकत्र काम करण्याची सूचना दिली आहे, असे माजी आमदार पाटील यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यातूनच हा कारखाना सुरु करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे.

३५०० मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता व सहवीज प्रकल्प असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यकारी संचालक, चीफ इंजिनिअर, चीफ केमिस्ट, मुख्य शेतकी अधिकारी, लेबर ऑफिसर, कार्यालयीन अधीक्षक व कॉम्प्युटर प्रोग्रामर या जागा भरल्या जाणार आहेत. शुक्रवारी (ता. २ सप्टेंबर) करमाळा येथील कारखान्याच्या गट ऑफिसमध्ये योग्य त्या कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
