करमाळा (सोलापूर) : भारतीय संस्कृतीतील सणांना महत्त्व देतानाच त्यामध्ये विचार करून बदल घडवणे आवश्यक आहे. हे बदल करण्यासाठी ज्ञानाच्या प्रवाहात राहणे गरजेचे. हे ज्ञान पुस्तक वाचनातून मिळते. ते ज्ञान जीवनात यशस्वी बनवते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या माधुरी आवटे यांनी केले आहे.

करमाळा मेडिकोज गिल्डच्या (केएमजी) वतीने ‘ओरॅकल केएमजी लायब्ररी’ची स्थापना करण्यात आली.आहे. यामध्ये ‘एक पुस्तक संघटनेला द्या त्या बदल्यात २०० पुस्तके आपणास वाचावयास मिळतील’, अशा विचारांनी ही लायब्ररीची स्थापना झाली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या आवटे उपस्थित होत्या. डॉ. तळेकर, डॉ. अभंग यांनी वाचन संस्कृतीबाबत मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात गौरी गणपतीच्या आरास स्पर्धेचेही आयोजन केले होते. यामध्ये डॉ. सौ. कटके डॉ. प्रणाली कदम, डॉ. सौ. शेटे, डॉ. सौ. साळुंखे यांना पारितोषिके देण्यात आले. लहान मुलांमध्ये निसर्गपूरक गणपतीमूर्ती बनवण्याची स्पर्धा झाली. यामध्ये अश्मीरा बागवान, कु. कटके, कु. शरयू जांभळे, कु. आदित्य जांभळे यांना बक्षीस देण्यात आले.

संघटनेच्या सभासदांनी एक पुस्तक संघटनेला दिले तर संघटनेतील इतर सभासदांची 200 पुस्तके आदलून- बदलून वाचायला मिळू शकतील असा एक आगळा- वेगळा वाचन संस्कृती अग्रक्रमाने पुढे नेणारा विचार डॉक्टरांच्या संघटनेच्या तर्फे पुढे आला आहे. केएमजीचे अध्यक्ष डॉ. माळवदकर व अध्यक्षा डॉ.सौ शेलार यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भुजबळ यांनी केले.
