करमाळा (सोलापूर) : ‘बारामती ऍग्रोचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्याबद्दल आदर आहेच पण त्यांच्या नावाने करमाळ्यात राजकारण करणारे व सर्वसामान्यांना पिळवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून त्रास होतो त्याचे दखल घेण्यासाठी आमदार रोहित पवारांनी नागरिकांचा कानोसा घ्यावा,’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी आदिनाथच्या प्रकरणावर टीका केली आहे. चिवटे म्हणाले तालुक्यातील आजी- माजी आमदार खाजगीत काय बोलतात? याची माहिती आमदार पवार यांनी घेणे गरजेचे आहे.
चिवटे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘आदिनाथ कारखाना बंद पडला तरच खाजगी कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर ऊस मिळेल. या माध्यमातून आपले राजकीय महत्त्व वाढेल व येणाऱ्या काळात आपण विधानसभेचे दावेदार होऊ. या भावनेतून तीन वर्षापासून बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी आमदार रोहित पवार यांना चुकीच्या माहिती देऊन आदिनाथ साखर कारखाना बंद पाडण्याचे काम केले, असा आरोप करत आता तरी त्यांनी सभासदांचे व तालुक्याचे हित लक्षात घेऊन आदिनाथ सुरू करण्यासाठी मदत करावी’, असे आवाहन चिवटे यांनी गुळवे यांना केले आहे.

‘तीन वर्षांपूर्वी आदिनाथ आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती ॲग्रोवन भाडे कराराने घेतल्यानंतर तालुक्यात आनंदाचे वातावरण होते. सर्व गटाच्या व पक्षाच्या नेते मंडळींनी त्यांचे स्वागत केले. आदिनाथ सुरू करून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना ते न्याय देतील, अशी भावना निर्माण झाली होती. जाणीवपूर्वक कायदेशीर अडथळे उभा करून बारामती ॲग्रोने आदिनाथ सुरू केला नाही,’ असा आरोप चिवटे यांनी केला आहे.

पुढे चिवटे यांनी म्हटले आहे की, ‘गेल्या वर्षी बारामती ॲग्रोचे विस्तारीकरण झाले होते. त्यांना गाळपासाठी अतिरिक्त सात ते आठ लाख टन उसाचे आवश्यकता होती. आदिनाथ कारखाना बंद पडला तरच आपल्या कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस मिळेल, या भावनेतून उपाध्यक्ष गुळवे यांनी गतवर्षी आदिनाथ बंद ठेवावा लागेल, अशी चुकीची माहिती आमदार पवार यांना दिली. आता मंत्री तानाजी सावंत यांनी पुढाकार घेऊन राज्य सहकारी बँकेची (एमएससी) थकबाकी भरून मदतीचा हात दिला आहे. याशिवाय मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आदिनाथच्या कर्ज पुनर्गठनला मान्यता देऊन आदिनाथ सहकार तत्वावर सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला आहे,’ असे असताना आदिनाथला एक रकमी परतफेड योजनेचा फायदा देऊ नये, असे सांगत सुभाष गुळवे न्यायालयात गेले आहेत.’

‘राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना 2009 च्या लोकसभा निवडणुकीत करमाळा तालुक्याने मताधिक्य दिले होते. याची दखल घेऊन आता आमदार पवार यांनी आदिनाथ सुरू करण्यासाठी १० कोटी डिपॉझिट करून कारखाना सुरू करण्यासाठी मदत करावी. कारखाना बळकवण्यापेक्षा कारखान्याच्या कारभारात लक्ष घालून वेळप्रसंगी कारखान्याला आर्थिक मदत करून आदिनाथ कारखान्याचा नावलौकिक वाढवावा,’ असे आवाहन चिवटे यांनी केले आहे.