राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्ष दिवसांदिवस वाढत आहे. शिवसेनेकडून बंडखोर नेत्यांना टार्गेट केले जात असताना शिंदे समर्थकही एकवटताना दिसत आहेत. नाराजी व्यक्त करत शिंदे यांचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत तयार होत असल्याचे चित्र आहे. करमाळा तालुक्यातही शिंदे समर्थक एकवटत असताना दिसत आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची काही दिवसांपूर्वी कार्यकारणी जाहीर झाली होती आता शिंदे गटाच्या कार्यकारणीचे लेटरपॅडही तयार झाले असून त्यात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना मात्र दणका दिला आहे. दुसरीकडे फलकावर मात्र त्यांचे छायाचित्र अजून कायम आहेत.

करमाळा तालुक्यात शिंदे गटाचे समर्थक शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारणी जाहीर करण्यात आली होती. त्यात संजय शिलवंत, राजेंद्र काळे यांच्यासह ग्रामीण भागातीलही निवडी जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिंदे समर्थक चांगेलच कामाला लागल्याचे चित्र आहे. चिवटे यांनी थेट भूमिका घेऊन शिंदे गटाकडून सोलापूचे संपर्क प्रमुख म्हणून सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

त्यानंतर पुणे येथे शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा तत्काळ निषेध करण्यासाठी शिंदे समर्थक कार्यकर्ते एकत्र आले आणि या घटनेचा निषेध करण्यात आला. हा निषेध करतानाच शिंदे समर्थक चिवटे यांचे नवीन लेटरपॅडवर निवेदन देण्यात आले. या निवेदनावर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र वगळण्यात आले आहे.

चिवटे यांच्या लेटरपॅडवर श्री छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र यात वगळण्यात आले असून यावर शिवसेनाचा लोगो मात्र कायम ठेवण्यात आला आहे. एकीकडे लेटरपॅड बदलले असून करमाळ्यातील शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या फलकावर मात्र उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र आहे. त्यामुळे करमाळा तालुक्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. आता फलकही बदलले जाणार का? हे पहावे लागणार आहे.
