करमाळा (सोलापूर) : दिगंबरराव बागल मामा यांच्या जयंतीनिमीत्त येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या तयारीने वेग घेतला आहे. या प्रदर्शनात असणाऱ्या स्टॉल व मंडपाचे भूमिपूजन गुरुवारी (ता. २) विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते झाले.

9 ते 13 मार्चला हे कृषी प्रदर्शन होणार आहे. यामध्ये साधारण ३०० स्टॊल असणार आहेत. याशिवाय या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘आठवणीतले मामा’ हे अभिनव दालन उभारले जाणार आहे. यामध्ये लोकनेते दिगंबरराव बागल मामांच्या दुर्मिळ व संस्मरणीय छायाचित्रांचे प्रदर्शन होणार आहे. यातून जुन्या आठवणींना व त्यांनी केलेल्या विकास कामांना उजाळा दिला जाणार आहे.
महिलांसाठी ‘माहेर मेळावा’ होणार असून यामध्ये हळदीकुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय हुतात्मा जवानांच्या वारसांचा सन्मान होणार आहे. हलगी व लेझीम स्पर्धाही होणार असून ग्रुप डान्स स्पर्धा व विविध कला महोत्सव यानिमित्ताने होणार आहेत. गुरुवारी झालेल्या भूमिपूजनावेळी साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, प्रा. कल्याणराव सरडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य एल. बी. पाटील, प्रा. अनिता देशमुख यांच्यासह मंगेश देशपांडे, संकेत कुलकर्णी आदी उपस्थित होते.