पारेवाडीकरांचा बदलला मार्ग! रेल्वे गेट बंदचा एसटीला फटका; नागरिकांना १२ किलोमीटरचा वळसा

पारेवाडी येथील भुयारी मार्गाचे सुरु असलेले काम.

केत्तूर (अभय माने) : मध्य रेल्वेच्या करमाळा तालुक्यातील वाशिंबे ते पारेवाडी दरम्यान असणारे पारेवाडी येथील रेल्वे गेट आजपासून (शनिवार) बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांना चारचाकीने रेल्वे रूळ क्रॉस करून यायचे असेल तर वाशिंबे किंवा पोमलवाडी या पर्यायी मार्गावरून म्हणजे सुमारे १२ किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. याबाबत ऍड. अजित विघ्ने यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार संजयमामा शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे.
पारेवाडीकरांचा बदलला मार्ग! रेल्वे गेट बंदचा एसटीला फटका; नागरिकांना १२ किलोमीटरचा वळसा

रेल्वे प्रशासनाने पारेवाडी येथील रेल्वे गेट बंद करताना पर्यायी मार्ग सुरुवातीला केला. मात्र तेथून नागरिकांना जाणे- येणे करता येत नाही. बंद केलेल्या रेल्वे गेटपासून सुमारे १०० फुटावर पर्यायी मार्ग म्हणून भुयार तयार केले. मात्र त्यात पाणी साचत आहे. तेथून चारचाकी गाड्या चालवणे अवघड होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना करमाळ्याला येईचे म्हटले तर वाशिंबे मार्गे पोफळाज व कुंभेज फाटा असे यावे लागत आहे.

रेल्वे गेट बंद होण्यापूर्वी कोर्टी किंवा पोन्धवाडी मार्गे करमाळ्याला येतात येत होते. रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करत असताना येथे पर्यायी सक्षम मार्ग न करता कायमस्वरूपी येथील गेट बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पारेवाडी रेल्वे गेट नंबर 26 (316/8-9 किमी) हे शनिवारपासून कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले तेव्हापासूनच यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याचा पहिला फटका करमाळा आगारातून पारेवाडीला येणाऱ्या सर्व एसटी बसेसला बसला असून विद्यार्थ्यांना शाळेसाठी धोकादायक प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी होत आहे. भुयारी मार्गाचे काम अद्याप सुरु असताना गेट बंद झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *