करमाळा (सोलापूर) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत करमाळा तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसची पदभरती प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार आहेत, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
करमाळा तालुक्यात पांडे, वरकुटे, अर्जुननगर, तरटगाव, भिवरवाडी व देवळाली या सहा गावात अंगणवाडी सेविका तर चिखलठाण, मलवडी, सातोली, कविटगाव, पांगरे, बिटरगाव वा, सांगवी, भिलारवाडी, वंजारवाडी, शेलगाव क, बोरगाव, आळसुंदे, बिटरगाव श्री व घारगाव येथे अंगणवाडी मदतनीस पदभरती केली जाणार आहे. यासाठी स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक असून १८ ते ३५ वयोगटातील महिला अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी १२ वी च्यापुढे शिक्षण आवश्यक आहे. विधवा महिलेसाठी ४० वर्ष वयाची मर्यादा आहे, असे सूर्यवंशी यांनी पत्रकात म्हटले आहे.