करमाळा (सोलापूर) : साखर कारखाने अवघ्या काही दिवसात सुरु होणार आहेत. मात्र करमाळा- जामखेड रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची कारखाने सुरु होण्यापूर्वी दुरुस्थी करण्याची अगर आहे, अन्यथा ऊस वाहतुकीवर परिणाम होईल. त्यामुळे कारखाने सुरु होण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करा, अशी मागणी तरटगावचे सरपंच डॉ. अमोल घाडगे यांनी केली आहे.

करमाळा- जामखेड रस्त्यावरून जामखेड तालुक्यातील ऊस करमाळा तालुक्यात येतो. याबरोबर करमाळा तालुक्यातील ऊस जामखेड तालुक्यातील हळगाव येथील साखर कारखान्याला जातो. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने उन्हाळ्यात या रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाच्या दुर्लक्षामुळे खड्डे बुजण्याचे काम पूर्ण झाले नाही. पावसामुळे या खड्यात भर पडली आहे. याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे, असे डॉ. घाडगे यांनी म्हटले आहे.

