करमाळा (सोलापूर) : नवरात्रोत्सव जवळ आला आहे. त्यामुळे श्री देवीचामाळ येथील कमळभवानी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी असते. त्यामुळे करमाळा शहरापासून श्री देवीचामाळ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपा व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी केली आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस आई कमलभवानी मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. ग्रामीण भागातूनही येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. यातील अनेक भक्त रोज पायी जातात. दोन वर्षापासून गोकुळ हॉस्पिटल ते खंडोबा मंदीर चौक या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्यावर्षी नवरात्र उत्सवमध्ये देखील तात्पुरती डागडुजी करून दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता. यावर कायमचा मार्ग काढणे आवश्यक आहे. याकडे लक्ष देऊन तात्काळ रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी कटारिया यांनी केली आहे.


