Video : दोन वर्षांनंतर उघडले आदिनाथचे गेट! शिखर बँकेकडून संचालक मंडळाकडे पुन्हा ताबा

Repossession from Shikhar Bank to the Board of Directors Adinath Sakhar karkhana Karmala taluka

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदीर म्हणून ओळख असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे गेट बुधवारी (ता. १४) म्हणजे तब्बल दोन वर्षांनी उघडले आहे. यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून यावर्षी कारखाना सुरु होईल असा विश्वास व्यक्त केला जाऊ लागला आहे. कर्ज वसुलीसाठी ऑक्टोबर २०२० मध्ये शिखर बँकेने (एमएससी) कारखाना ताब्यात घेऊन मुख्य गेट व प्रशासन इमारत सील केली होती. आता याचा ताबा संचालक मंडळाकडे देण्यात आला आहे.

आदीनाथ सहकारी साखर कारखाना तीन वर्षांपासून बंद होता. हा कारखाना पुन्हा संचालक मंडळाच्या ताब्यात आला आहे. बुधवारी या कारखान्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया झाली आहे. आदीनाथ सहकारी साखर कारखान्याचा न्यायालयीन वाद सुरू आहे. कर्ज वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (एमएससी) ताब्यात घेतला होता. त्यानंतर बँकेने लिलाव प्रक्रिया राबवली होती. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोने हा कारखाना लिलाव प्रक्रियेने भाडेतत्त्वावर घेतला. मात्र यामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली.

दरम्यान राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना एमएससी बँक कारखाना कोणाच्या ताब्यात देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बारामती ऍग्रोने व संचालक मंडळाने कारखाना सुरु करण्यासाठी उत्सुकता दाखवली होती. मात्र आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी यामध्ये लक्ष घातले. माजी आमदार नारायण पाटील यांच्या माध्यमातून हा कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू ठेवण्यासाठी सुरुवातीला एक कोटी रुपये भरण्यात आले. दरम्यान आदिनाथ कारखान्यातील सत्ताधारी बागल व माजी आमदार पाटील गटाच्या संचालकांना आदिनाथ कारखान्यासाठी एकत्र काम करण्याच्या सूचना मंत्री सावंत यांनी दिल्या.

गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री सावंत यांच्या उपस्थितीत पुणे येथे पाटील व बागल यांची बैठक झाली होती. याबरोबर हा कारखाना सुरू करण्यासाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांच्या प्रयत्नातून काम सुरू केले होते. हा कारखाना यावर्षी सुरळीतपणे सुरू व्हावा यासाठी सावंत यांनी पुन्हा शेवटच्या क्षणी दोन कोटी रुपये देऊन मदत केली आहे. त्यांनी सुमारे ११ कोटी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *