करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सोगाव पूर्व ते उमरड दरम्यानचा ५ किलोमीटर रस्त्याची दोन वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. या रस्त्याकडे त्वरित लक्ष देण्यात यावे. अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, अस इशारा नागरिकांनी तहसीलदार समीर माने यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

येथील रस्ता खराब झाल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यातुन मार्ग काढवा लागत आहे. नागरीकांना प्राथमिक उपचारासाठी व महिलांना प्रसुतीसाठी याच मार्गाने जेऊर किंवा करमाळा येथे यावे लागते. सोगाव पूर्व हे पुनर्वसन झालेले गाव आहे. उजनी लाभक्षेत्रात हे गाव येत असल्याने पाणथळ जमिनीमुळे चिखल होतो आहे. येथे रस्ता खचण्याचे प्रमाण अधिक आहे. रस्त्याची ऊंची वाढवुन दुरुस्ती करण्याबाबत बांधकाम विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला तरीही दखल घेण्यात आली नाही.

प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नागरीकांची होणारी गैरसोय दूर करावी. अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार माने यांना देण्यात आला आहे. विजय गोडगे, उपसरपंच तानाजी राखुंडे, अतुल गोडगे, ज्ञानेश्वर गोडगे, धनंजय गोडगे, ब्रम्हदेव सरडे, भाऊ राखुंडे, रेवन्नाथ गोडगे, भागवत मांढरे, रामभाऊ पांढरे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


