करमाळा (सोलापूर) : पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेले आरक्षण यावर आलेल्या हरकतीवर सुनावणी होऊन शुक्रवारी (ता. ५) अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे. दुसरीकडे मात्र इच्छुकांची अनेक नावे समोर येत आहेत. काही कार्यकर्त्यांकडून उमेदवारी देण्याबाबत मागणीही केली जात आहे, असे बागल गटाकडून राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष सतीश नीळ हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. यावर नीळ यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलला प्रतिक्रिया दिली आहे.

करमाळा पंचायत समितीच्या १२ गणासाठी शुक्रवारी अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार हिसरे गण सर्वसाधारण आहे. त्यामुळे येथे सर्वच राजकीय गटांकडून इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. त्यात बागल गटाकडून नीळ यांचेही संभाव्य उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे. यावर त्यांच्याशी संवाद झाला तेव्हा त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

नीळ म्हणाले, ‘मी बागल गटावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. गट वाढवण्यासाठी जे शक्य ते मी करत असतो यापुढेही प्रयत्न करणार आहे. कार्यकर्त्यांकडून माझे नाव पुढे येत आहे. त्या कार्यकर्त्यांचे मी मनापासून आदर करतो. मात्र कार्यकर्त्यांसह माझ्यासाठी गटप्रमुखाचाही आदेश महत्वाचा आहे. त्यामुळे गटप्रमुख जो निर्णय घेतील. तो मला मान्य असणार आहे.’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे काय परिणाम होणार हेही पहावे लागणार आहे. २०१७ प्रमाणे गट व गण राहणार की महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे या निवडणुका होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
