करमाळा (सोलापूर) : जानेवारीमध्ये दुसरे विश्वात्मक संत साहित्य संमेलन त्रिपुरामध्ये होणार आहे, अशी माहिती विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती मदन गोसावी महाराज यांनी दिली आहे. कोल्हापूर येथे पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन झाले होत. त्यानंतर दुसरे साहित्य संमेलन कोठे घ्यायचे याबाबत चर्चा करण्यासाठी पुणे येथे बैठक घेण्यात आली होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य कला साहित्यिक मंचाचे अध्यक्ष प्रकाश खांडके, मोहन तिवारी, बाबा पाटील, बाळासाहेब काशीद, सोलापूर अखिल भारतीय वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय महाराज अभंग, कंदरचे भास्कर भांगे, घाडगे महाराज, माऊली महाराज मेढे, ऍड. अजित विग्ने उपस्थित होते.

संमेलनध्यक्ष न्यायमूर्ती गोसावी म्हणाले की, कोल्हापूरमध्ये करवीर नगरीत पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन झाले होते. त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिष्णु देबबर्मा हे यावेळी उपस्थित होते. तेव्हा त्यांनी त्रिपुरामध्ये विश्वात्मक संत साहित्य संमेलन घ्यावे, अशी विनंती केली होती. त्यामुळे हे दुसरे विश्वात्मक संत साहित्य संमेलन त्रिपुरामध्ये होणार आहे. जानेवारीमध्ये हे संत साहित्य संमेलन होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून संत महंत वारकरी जाणार आहेत, त्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.

