करमाळा (सोलापूर) : ‘दहीगाव उपसा सिंचन योजनेमुळे वरकटणे व या परिसरात केळीची जास्त लागवड झाली आहे. ही केळी गुणवत्तापूर्ण असल्यामुळे राज्यासह देशाबाहेर या केळीला मोठी मागणी आहे. त्यामुळेच वरकटणे भविष्यमध्ये केळीचे हब बनेल,’ असा विश्वास करमाळा तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी व्यक्त केला आहे.

वरकटणे येथे राज्य सरकारचा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभाग (आत्मा) व राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड यांच्या वतीने आज (सोमवारी) ‘किसान गोष्टी’ कार्यक्रम अंतर्गत निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये करमाळा तालुका कृषी अधिकारी वाकडे यांनी मार्गदर्शन केले.

आत्माचे व्यवस्थापक अजयकुमार बागल, सत्यम झिंजाडे, जैन इरिगेशन सिस्टीमचे केळी तज्ञ किरण पाटील, ट्रायडेंट ऍग्रो कॉम प्रायव्हेट लि. मुंबईचे सहाय्यक व्यवस्थापक दिग्विजय राजपूत, राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर, वॉटर संस्थेचे विजय पाटील, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक प्रतीक गुरव, आशिष लाड, सरपंच बापूसाहेब तनपुरे, उपसरपंच अनिल कोकाटे उपस्थित होते.

पाटील यांनी ‘लागवडीपासून ते केळीची वेन होण्यापर्यंतच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये काय काळजी घ्यावी’ याविषयी मार्गदर्शन केले. राजपूत यांनी ‘केळीची वेण झाल्यापासून ते घड विक्रीला जाईपर्यंतच्या 4 महिन्याच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये कोणती फवारणी घ्यावी? घड आच्छादन कशाने करावे?’ याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. वीर यांनी राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी स्थापन करण्यामागचा उद्देश सांगितला.