करमाळा (सोलापूर) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी बागल व जगताप यांच्यातील वादात दाखल झालेल्या गुन्ह्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह सात संशयित आरोपींना बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषमुक्त ठरवले आहे. ‘जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामकाजात अडथळा’ अशा आरोपातून माजी आमदार जगताप यांच्यासह माजी नगराध्यक्ष वैभव जगताप, भाजपचे शंभुराजे जगताप, सचिन चांदगुडे, जयराज चिवटे, शिवराज चिवटे, विकास फंड यांचेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी फिर्याद दिली होती. बार्शी येथील सत्र न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी यामध्ये सातजणांना दोषमुक्त केले आहे.
Video : मुलं दत्तक घेऊन जपली सामाजिक बांधिलकी! १९६५ पासून एकदाही अध्यक्ष न नेमलेले करमाळा शहरात गणेशोत्सव मंडळ
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडी दिवशी वाद झाला होता. त्यामधे अर्जदारांकडून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे व ॲड. कमलाकर वीर यांचे मार्फत दोषमुक्त करण्याचा अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीवेळी ॲड .थोबडे यांनी आपले युक्तिवादात जीवे ठार मारणेबाबत व सरकारी कामकाजात अडथळा आणलेबाबतचे कलम लागू होत नसलेबाबत युक्तिवाद करीत त्याच्या पृष्ठयार्थ उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले.

ते ग्राह्य धरून बार्शी येथील सत्र न्यायाधीश जगदाळे यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामकाजात अडथळा आणण्याच्या कलमातून संशयित आरोपींना दोषमुक्त केले आहे. इतर कलमान्वये चार्ज फ्रेम करण्याचे व सदरचा खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी करमाळा यांच्यासमोर चालविणेसाठी वर्ग करण्याचे आदेशही यावेळी दिले आहेत. यात ॲड. थोबडे, ॲड. वीर, ॲड. निखिल पाटील, ॲड. अभिजीत इटकर, ॲड. महेश जाधव व विशेष सरकारी वकील ॲड. राज पाटील यांनी काम पाहीले.

