करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणूक होताच नेतेमंडळी आता विधानसभेच्या तयारी लागली आहे. यातूनच माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे कार्यकर्ते स्पष्टीकरण देऊ लागले आहेत. ‘सततच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघात १२ उपवीज केंद्रामध्ये पाच एमव्ही क्षमतेचे अतिरिक्त १३ फिडर मंजूर झाल्याचा’ दावा माजी आमदार पाटील यांनी केला होता. त्याला आमदार शिंदे समर्थकांनी आमदार शिंदे यांनी केलेल्या कामाचे पुरावे देत ‘माजी आमदार पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात विजेची नक्की कोणती कामे केली’? असा प्रश्न केला आहे.
माजी आमदार पाटील यांनी केलेला दावा
माजी आमदार नारायण पाटील म्हणाले, २०१६ पासुन करमाळा तालुक्यात ३३/११ उपवीज केंद्रांची क्षमतावाढ व्हावी म्हणून पाठपुरावा केला. यामधून आपण काही सबस्टेशनमध्ये पाच आणि तीन एमव्ही क्षमतेचे अतिरिक्त फिडर मंजूर करण्यात यशस्वी झालो. यामुळे वीजेचा प्रश्न काही प्रमाणात सुटला. सिंचनक्षेत्रात वाढ झाल्याने वीजेची मागणी वाढली. यावर उपवीज केंद्र सक्षमीकरण हा एकमेव पर्याय होता. तो प्रश्न लावून धरला आणि यश मिळाले. शेतीसाठी पुर्ण दाबाने आणि अखंडीत वीज पुरवठा व्हावा म्हणून प्रयत्न केला. उर्वरित मागण्यांसाठी पाठपुरावा सुरु असून ३३/११ केव्ही क्षमतेचे नवीन सबस्टेशन आणि तालूक्यात आणखी एक २२० केव्ही क्षमतेचे वीज केंद्र निर्माण होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
शिंदे गटाकडून उत्तर
आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक दादासाहेब जाधव व नंदकुमार जगताप म्हणाले, माजी आमदार नारायण पाटील यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान विजेचा प्रश्न सुटावा म्हणून केलेले काम पुराव्यासह मांडावे. त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. आमदार शिंदे यांनी आवाटी येथे मंजूर केलेले उपकेंद्र पूर्ण झालेले असून सद्या लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. रावगाव व राजुरी येथील उपकेंद्रांचे भूमिपूजन झाले असून आचारसंहित्यामुळे हे काम लांबले होते. आता त्याचे काम सुरू होईल. आमदार शिंदे यांनी विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वपूर्ण काम केले आहे, असे म्हणत केलेल्या पाठपुराव्याची पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत. बारलोणी, कुंभेज, वांगी २, जातेगाव, वीट, घोटी, केम, झरे, पोमलवाडी, उपळवटे येथील प्रस्ताव पाठविले आहेत. तेही लवकरच मार्गी लागतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे पाठपुरावा करत नोव्हेंबर २०२२ मध्ये गौंडरे येथे २२० केव्हीचे विजकेंद्र मंजूर होण्याची मागणी केली होती तीही मंजूर झाली परंतु त्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने फेर सर्वेक्षण करण्यात आले. सौंदे येथे त्यासाठी जागा उपलब्ध झालेली आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, माजी आमदार पाटील यांच्याकडून गावभेट दौऱ्यामध्ये वीजप्रश्नाबाबत निराधार वक्तव्ये करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांनी याबाबत पुरावे दाखवावेत, असे आवाहन जाधव व जगताप यांनी केले आहे.