करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील पुर्व भागातील रस्ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा तिव्र आंदोलन करु, असा इशारा युवा सेना माजी तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

पुर्व भागातील हिसरे, हिवरे, कोळगाव, गौंडरे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसात रस्त्यावर अक्षरा तळी साचत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत, असा आरोप फरतडे यांनी केला आहे. पुर्वभागातील रस्त्याचा अनेक वर्षांपासून प्रश्न गंभीर आहे. जिल्हा परिषद निधीतून काही ठिकाणी दुरुस्ती करण्यात आला मात्र ते काम निकृष्ट झाले.

ऊस वाहतूक संपताच रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, असे सांगीतले जात होते. मात्र निधी मंजूर असतानासुद्धा ठेकेदार व अधिकाऱ्यांनी काम सुरु केले नाही. सध्या पावसाचे दिवस आहेत. रिमझिम व मुसळधार पावसाने संपूर्ण रस्ता उखडून गेला आहे.
गौंडरे ते कोळगाव रस्त्यावर असलेल्या पुलावर मोठ्ठा खड्डा पडला असून गंभीर धोका निर्माण झाला आहे. मात्र पाटबांधारे विभाग परांडा व जिल्हा परिषद बांधकाम विभाग करमाळा या कामाकडे हात झटकत असून मोठी दुर्घटना घडल्यावरच जागे होणार का? असा प्रश्न फरतडे यांनी केला आहे.