करमाळा (सोलापूर) : करमाळा ते टेंभुर्णी राज्य महामार्गावर बागल पेट्रोलपंपाजवळ रविवारी (ता. ११) सकाळी ६ वाजताच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या ट्रकने चार म्हशींचा बळी घेतला आहे. देवळाली येथील मिटू शिंदे यांनी नेहमीप्रमाणे पहाटे म्हशी चारायला सोडल्या होत्या. चारून झाल्यानंतर घराकडे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेची माहिती समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव ट्रकची जोराची धडक बसल्यानंतर म्हशी जाग्यावरच ठार झाल्या. रस्त्याच्या बाजूला पडलेले म्हशींचे मृतदेह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे मन हेलावून टाकत होते.

देवळाली येथील शिंदे यांच्याकडे साधारण १० म्हशी आहेत. त्यातील काही म्हशी दूध देतात तर काही लहान आहेत. नेहमीप्रमाणे त्यांनी रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास मशी चरण्यासाठी सोडल्या होत्या. ६ वाजताच्या सुमारास त्यांनी म्हशी घराकडे चालवल्या होत्या. बागल पेट्रोलपंपाजवळ आल्यानंतर करमाळ्याकडून जेऊरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. त्यात चार म्हशी जागेवरच ठार झाल्या. एक म्हैस जखमी झाली असल्याचे सांगितले जात आहे.

ठार झालेल्या म्हशींमध्ये एक दूध देणारी आहे. दोन रेड्या आहेत तर एक हल्या आहे. जोराची धडक बसल्याने एका माशीच्या तोंडावरून चाक गेले आहे. एका म्हशीच्या गळ्याला लागले आहे तर दोन म्हशींना जबर मार लागून खाली पडल्या त्यात त्या जागीच ठार झाल्या. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक भरधाव वेगात पुढे निघून गेला होता. मात्र तेथील काही लोकांनी त्याचा पाठलाग करत देवळालीच्या पुढे चढला पाणी टाकीजवळ जाऊन धरला आहे, असे समजत आहे.

म्हशींना धडक बसल्यामुळे ट्रकचे बॉनेट पूर्ण चेपले आहे. त्यावर शेणाचे वर्ण पडले आहेत. त्या ट्रकला पाहिल्यानंतर तो अपघात किती जोराचे असेल याचा अंदाज येत आहे. म्हशींना चारून आणल्यानंतर दूध काढले जाते, असे समजत आहे.