करमाळा (अशोक मुरूमकर) : ऊस गाळप हंगाम सुरु होऊन अवघे काहीच दिवस झालेले असताना करमाळा तालुक्यात सलग दोन दिवसात ऊस वाहतुकीचे दोन बळी गेले आहेत. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून यातून ऊस वाहतूक करणाऱ्यांनी आणि या वाहनांपासून जाणाऱ्यांनीही काळजी घेणे आवश्यक आहे.
करमाळा तालुक्यात गुरुवारी रात्री फिसरे दरम्यान ऊस वाहनाला धडक बसून एकाचा मृत्यू झाला होता. कन्हैया परदेशी (वय ३८) असे त्यांचे नाव होते. ते करमाळा शहरातील होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मध्यरात्रीच्या दरम्यान रोशेवाडी ते वीट दरम्यान ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटून चालक ठार झाला. मयूर कांतीलाल क्षीरसागर (वय २०) असे त्यांचे नाव आहे. ते पोन्धवडी येथील आहेत. त्यांच्या पाश्च्यात आई व लहान बहीण आहे. त्याचा हा पहिला ऊस गाळप हंगाम असल्याचची माहिती मिळत आहे. दोन्ही अपघाताचे कारण अद्याप समजले नाही. मात्र ऊस वाहतुकीचाच हा बळी असल्याची चर्चा आहे.
ऊस गाळप हंगाम सुरु झाला असून परिसरातील सर्व साखर कारखाने सुरु झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर ऊस वाहतूक करणारी वाहने दिसू लागली आहेत. या व वाहनांपासून सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे. हे अपघात टाळण्यासाठी पोलिस व आरटीओ यांनीही दक्ष राहणे आवश्यक आहे. अशा वाहनांना रिप्लेक्टर बसवणे व खबरदारीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.
बारामती ऍग्रो, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, अंबालिका, कमलाई या कारखान्याची ऊस तोड यंत्रणा सक्रिय झाली आहे. कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर सध्या रस्त्यांवर दिसत आहेत. अशा वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे. यातून होणारे अपघात टाळण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
‘वाहन चालवताना विशेष काळजी घ्या, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करताना काळजी घ्या, वाहनांचा वेग मर्यादित ठेवा, चढ व उताराला ऊसाच्या ट्रॅक्टरच्या मागे चालू नका, सुरक्षित अंतर ठेऊन दक्षता घ्या, वाहतुकीचे नियम पाळा’, असे आवाहन पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी केले आहे.
ऊस वाहतूकदारांना सूचना
– रस्त्याच्या एका बाजुने वाहतूक करावी. (मधोमध न चालविता)
– ट्रॅक्टर चालकांनी रोडवर ओव्हरटेक करण्याची स्पर्धा करू नये
– गाणी कमी आवाजात ठेवावीत
– रस्त्यावर दोन ट्रॅक्टरच्यामध्ये किमान अंतर राखून वाहतूक करणे. (एकमेका मागे रांगेत वाहतूक न करणे )
– उठीसाठी चाकांना लावलेले मोठे मोठे दगड रस्त्याच्या बाजूला ठेवतात.
– दुचाकीला दगड लागून अपघात होतात ते टाळावेत
