करमाळा (सोलापूर) : तीन वर्षांपासून बंद असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे यावर्षी धुराडे पेटवण्यासाठी दिवसरात्र काम सुरु आहे. दसऱ्यादिवशी कारखान्याचा बॉयलर पेटवण्याची तयारी सुरु असून तसे प्रयत्न सुरु आहेत, असे कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे. बंद पडलेला आदिनाथ कारखाना यावर्षी सुरु करण्यासाठी तालुक्यातील एकमेकांचे राजकीय विरोधक बागल व पाटील गट एकत्र आले आहेत. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचनेने हे दोन्ही गट उघडपणे कारखान्यासाठी एकत्र काम करत आहेत.
आदिनाथ कारखाना सलग तीन वर्ष बंद राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कारखान्याचा वाद न्यायालयात सुरु आहे. बारामती ऍग्रो, संचालक मंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व कामगार यांच्यात सुरु आहे. मात्र अनेक घडामोडी नंतर बँकेने हा कारखाना पुन्हा संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे. कारखाना सुरु करण्यासाठी कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक डांगे यांच्या मार्गदर्शन घेतले जात आहे. कारखाना सुरु करणे हे मोठे आव्हान डांगे यांच्यासह पाटील व बागल गटाने स्वीकारले आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हा कारखाना सील करून ताब्यात घेतला होता. आता काल (बुधवारी १४ सप्टेंबार २०२२) पुन्हा बँकेने संचालक मंडळाच्या ताब्यात कारखाना दिला आहे. कारखाना सुरु करण्यासाठी पैशाची मोठी अडचण निर्माण झाली. मात्र यावरही मार्ग काढत कारखाना दिवाळीत सुरु करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

डांगे म्हणाले, कारखाना सुरु करण्यासाठी कामगारांचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. कमीतकमी पैशात काम करणाऱ्याला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. त्यांच्या जेवणाचे ही कमीतकमी पैसे देऊन नियोजन केले आहे. वेळेत काम पूर्ण केले तर संबंधित कामगारांना ५ टक्के बोनस दिला जाईल. मात्र वेळेत काम केले नाही तर २ टक्के दंड आकारला जाणार आहे. वाहतूकदार, ऊसतोड कामगार यांचेही नियोजन केले जात आहे. कारखाना सुरु करण्यासाठी पैशांची गरज आहे. आतापर्यंत दत्तात्रय जाधव, डॉ. वसंतराव पुंडे, प्रा. रामदास झोळ यांनी केलेल्या मदतीतून काम केले जात आहे. आणखी पैशांची गरज असून आदिनाथ बचाव समितीच्या बैठकीत ज्यांनी घोषणा केल्या होत्या. त्यांनी त्वरित मदत जमा करावी, असे आवाहन डांगे यांनी केले आहे.

आदिनाथ कारखाना या हंगामात सुरु करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. दसऱ्यादिवशी बॉयलर पेटवायचा व दिवाळीत कारखाना सुरु करायचा या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, असे सांगतानाच डांगे म्हणाले, माजी आमदार नारायण पाटील व बागल गट हे यासाठी मोलाचे सहकार्य करत आहेत. मंत्री सावंत यांनी आर्थिक मदत केली आहे. कारखान्यासाठी कोणीही राजकारण न करता मदत करणे आवश्यक आहे. तालुक्यातील इतर राजकीय मंडळी देखील आपल्याला मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
संपादन : अशोक मुरूमकर
– Video : दोन वर्षांनंतर उघडले आदिनाथचे गेट! शिखर बँकेकडून संचालक मंडळाकडे पुन्हा ताबा