करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी डॉ. वसंतराव पुंडे यांनी जाहीर केलेल्या १० लाख रुपयांपैकी २ लाख रुपयांची मदत सोमवारी (ता. १२) कारखान्याचे अध्यक्ष धंनजय डोंगरे यांच्याकडे दिले आहेत. यावेळी माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, माजी आमदार नारायण पाटील गटाचे नेते देवानंद बागल, करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, नितिन जगदाळे आदी उपस्थित होते.
तीन वर्षांपासून बंद असलेला आदिनाथ कारखाना सुरु करण्यासाठी माजी आमदार पाटील व बागल गटाचे संचालक एकत्रित प्रयत्न करत आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशाने कारखान्यासाठी बागल व पाटील गटाचे संचालक एकत्र काम करत आहेत. कारखाना सुरु करण्यासाठी पैशांची गरज असून त्यासाठी सभासदांनी मदत करावी, असे आवाहन केले होते.

त्यानुसार साडेचे माजी सरपंच दत्तात्रय जाधव यांनी यापूर्वी रोख १ लाख रुपये दिले होते. त्यानंतर आता डॉ. पुंडे यांनीही २ लाख दिले आहेत. राहिलेले पैसेही ते देणार आहेत. याशिवाय ज्यांनी मदत जाहीर केली आहे त्यांनी तत्काळ पैसे जमा करावेत, असे आवाहन डांगे यांनी केले आहे. दरम्यान नितीन जगदाळे यांना कारखान्यात सहीचे अधिकार दिले असल्याचे सांगितले जात आहे.

