करमाळा (अशोक मुरूमकर) : आदिनाथ कारखाना यावर्षीही सुरु होणार की बंदच राहणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अखेर हा कारखाना सुरु झाला आणि साधणार ७६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून हंगामाची सांगताही झाली. आता काही दिवसातच या कारखान्याची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. तीन वर्ष आदिनाथ कारखाना बंद होता मात्र निवडणुकीच्या तोंडावर हा कारखाना सुरु करण्यात यश आल्याने हा मुद्दा गाजणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही आपल्या बाजूने यावर आरोप- प्रत्यारोप करतील त्यात आदिनाथ बचाव समितीही एक वेगळी भूमिका मांडले असे चित्र आहे.

शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदिर म्हणून या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडे पहिले जाते. शेतकरी, ऊस वाहतूकदार यांच्यासाठी हा कारखाना महत्वाचा आहे. हा कारखाना सुरु असेल तर तालुक्यातील इतर कारखान्यावर याचा परिणाम होतो. मात्र अनेकदा हा कारखाना राजकारणाचा बळी ठरला आहे. आताही तसेच होणार का हे पहावे लागणार आहे. निवडणूक अजून सुरु झालेली नाही. मात्र या निवडणुकीत जगताप गट, शिंदे गट, बागल गट आणि पाटील गट यांच्या महत्वाच्या भूमिका राहतील. यात बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे कसे या निवडणुकीत उतरतील हेही पहावे लागणार आहे. यावर सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने घेतलेला हा आढावा.
आदिनाथ कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांच्या म्हणण्यानुसार आदिनाथ कारखाना हा राज्यातील एकमेव कारखाना आहे त्याने यावर्षीचे सर्व पेमेंट रोखीने केली आहेत. कामगारांच्या पगारीही रोखीने दिले. त्यामुळे कारखान्याबाबत एक ‘गुडवील’ तयार झाले आहे. बारामती ऍग्रोकडे गेलेला हा कारखाना थांबण्यात यश आले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री तानाजी सावंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व माजी आमदार नारायण पाटील यांचे योगदान महत्वाचे आहे. बारामती ऍग्रोला हा कारखाना भाडेतत्वार दिला होता. मात्र त्यांनी वेळेत सुरु केला नाही. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचे हीत आणि सर्व संघटना आणि शेतकऱ्यांच्या बळावर हा कारखाना सुरु केला. याचा आम्हाला फायदा होणार आहे.

बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या म्हणण्यानुसार आदिनाथ कारखाना हा प्रथम कोणी बंद पाडला होता? हा खरा प्रश्न आहे. आमच्याकडे कारखाना आला असता तर शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा झाला असता. सुरुवातीला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र सत्तांतर झाल्यामुळे हा कारखाना आम्हाला मिळू शकला नाही. पवार यांच्याकडे कारखाना आला असता तर आम्ही २८०० च्या पुढे ऊसाला दर दिला असता. यात शेतकऱ्यांचे नुकसान होणार झाले आहे. तालुक्यातील मकाई कारखान्याची काय अवस्था आहे हे सर्वजण पाहत आहेत, तशी अवस्था आदिनाथची यापुढे तरी होऊ नये. कारखाना चालू करणे आणि चालवणे यात फरक आहे. येणाऱ्या काळात कारखाना कसा सुरु होईल हे पहावे लागणार आहे. पुढील हंगामात हा कारखाना कसा सुरु केला जाणार? कर्ज परत कसे करायचे? कारखाना सुरु करताना दुरुस्तीला खूप मोठा खर्च झालेला आहे याचाही विचार होणे आवश्यक आहे. येणाऱ्या निवडणुकीत आदिनाथच्या सर्व विषयांचे दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे.

आदिनाथ बचाव समितीचे सदस्य प्रा. रामदास झोळ यांच्या म्हणण्यानुसार आदिनाथ कारखाना व्यवस्थित सुरु राहावा म्हणून निवडणूक बिनविरोध करणे आवश्यक आहे. तालुक्यातील बागल, जगताप, पाटील व शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांसह आदिनाथवर प्रेम करणाऱ्या सर्व पक्षाच्या प्रमुखांनी यामध्ये लक्ष घालून चांगले संचालक यामध्ये पाठवावेत. आदिनाथची निवडणूक लढवण्यापूर्वी आपण स्वतः काही प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत. कारखाना व्यवस्थित सुरु करायचा तर पैसे खर्च करावे लागणार आहेत. याचाही विचार करणे आवश्यक आहे. कारखाना यावर्षी चांगला चालला पण पुढेही तो चांगला चालला पाहिजे यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. आरोप- प्रत्यारोप करण्यापेक्षा सामूहिक जबाबदारी म्हणून याकडे पहाणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या म्हणण्यानुसार करमाळा तालुक्यातील ऊस मोठ्याप्रमाणात बारामती ऍग्रो आणि अंबालिका या कारखान्यांना जातो. कारण त्यांचे दर चांगले आहेत. आणि त्यांचे पेमेंट थकीत नाही. शेतकऱ्यांना ऊस दर चांगला मिळणे आवश्यक असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार होणे आवश्यक आहे.
तरटगावचे माजी सरपंच डॉ. अमोल घाडगे म्हणाले, आदिनाथ कारखान्यासाठी सर्व गटातील आर्थिक सक्षम असलेल्या आणि आदिनाथमध्ये उत्स्फूर्तपणे काम करण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांना स्थान देणे आवश्यक आहे. हा कारखाना बिनविरोध होणे आवश्यक आहे. सर्व गटातील प्रमुखांचे म्हणणे आदिनाथ व्यवस्थित सुरु रहावा असेच असेल तर बिनविरोध करायला काय अडचण आहे. पवार, मोहिते, शिंदे, सावंत व बागल हे सर्व कारखानदार आहेत. त्यांनी निवडणूक न लादता त्यांच्या विचारांचे संचालक पाठवून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून कोणताही आदिनाथवर आर्थिक बोजा न टाकता कारखाना कसा सुरु राहील हे पहाणे आवश्यक आहे.
भीमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले म्हणाले, आदिनाथ कारखाना हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा कारखाना आहे. हा कारखाना सुरु झाला तरी इतर कारखान्यावर याचा परिणाम होतो. उसाच्या पट्यात असलेला हा कारखाना आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा कोण करणार आहे, हे पहाणे आवश्यक आहे. फक्त राजकारण म्हणून नाही तर ऊस वाहतूकदार शेतकरी यांना कोण फायदा करून देणार आहे. याचा विचार होणे आवश्यक आहे.