करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या राजकीय वक्त्यावरून आता विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी या सभेवर जोरदार टीका केली आहे. ‘आदिनाथ कारखान्यात अजूनही त्यांना राजकारणच करायचे आहे. सर्वसाधारण सभेत कामगारांचे व शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांपेक्षा त्यांना राजकारण महत्वाचे वाटत आहे’, असे म्हणत गुळवे यांनी टोला लगावला आहे.

तीन वर्षांपासून आदिनाथ कारखाना बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हा कारखाना यावर्षी सुरु करण्यासाठी मंत्री तानाजी सावंत यांनी आर्थिक मदत केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही मदत करत असल्याचे सांगितले जात आहे. कारखाना सुरु व्हावा म्हणून मंत्री सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कट्टर विरोधक असलेले माजी आमदार नारायण पाटील व बागल गट एकत्र काम करणार आहेत. त्यानुसार आज (शुक्रवारी) झालेल्या सभेसाठी बागल व पाटील एकत्र आले होते. मात्र या सभेत माजी आमदार पाटील यांनी विधानसभेचा विषय काढला. त्यावर बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी ‘असा’ काही विषय झाला नाही हे राजकीय व्यासपीठ नाही असे सांगितले. व्यासपीठावरच या विषयावरून तीन मिनिटे बागल व पाटील यांच्यात प्रश्न उत्तरे झाली. दरम्यान पाटील यांनी दिलगिरीही व्यक्त केली. मात्र या विषयावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
Video : विधानसभेवरून पाटील व बागल यांच्यात प्रश्न- उत्तरे! शेवटच्या क्षणामुळे गाजली ‘आदिनाथ’ची सर्वसाधारण सभा

बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष गुळवे म्हणाले, सर्वसाधारण सभेत सभासद, वाहतूकदार, शेतकरी यांच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांवर चर्चा होणे आवश्यक आहे. कारखाना बंद आहे तो सुरु होणे आवश्यक आहे. अशा राजकारणामुळेच हा कारखाना बंद पडला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने केलेल्या कारवाईत लिलाव प्रक्रियेद्वारे कारखाना बारामती ऍग्रोकडे आला होता. मात्र राजकारणासाठी हा कारखाना बारामती ऍग्रोकडे येण्यापासून अढथळा निर्माण केला. कारखाना बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मात्र अजूनही यामध्ये राजकारणच केले जात आहे.

विधानसभेची चर्चा करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मंदिरात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस दर देण्यावर चर्चा होईला हवी होती, असे म्हणत त्यांनी समाचार घेतला आहे. आदिनाथ सुरु करून शेतकऱ्यांना चांगला दर दिला तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, पण कारखान्याच्या नावाखाली असे राजकारण करून शेतकऱ्यांचे व कामगारांचे नुकसान करू नये, असे गुळवे यांनी म्हटले आहे.